Telangana Farmhouse Drugs Party: तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका फार्महाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. छापा टाकताना पोलिस पथकावर गोळीबारही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांना ताब्यात घेतले. या पार्टीत टीडीपीचे एक खासदारही उपस्थित होते. त्यांच्यासह एका माजी आमदारासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळी अंमली पदार्थांची पावडरही आढळली. तसेच संबंधित खासदाराचा ड्रग्ज चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उद्योगपती नमित शर्मा यांनी केला गोळीबार
चेवेल्ला विभागाचे डीसीपी योगेश गौतम म्हणाले, “आम्हाला माहिती मिळाली होती की एका फार्महाऊसमध्ये परवानगीशिवाय पार्टी आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी रात्री सुमारे ९.३० वाजता घटनास्थळी छापा टाकला. पोलिस पथक तेथे पोहोचताच दिल्लीतील रिअल इस्टेट व्यावसायिक नमित शर्मा यांनी बंदुकीतून गोळीबार केला. ही बंदूक रोहित रेड्डी यांचा धाकटा भाऊ रितेश रेड्डी यांची होती आणि तिचा परवाना वैध होता; मात्र गोळीबार नमित शर्मा यांनी केला. पार्टीदरम्यान पोलिसांना दोन ग्रॅम पांढरी अंमली पदार्थांची पावडरही आढळली. या पार्टीत लोकप्रतिनिधी, रिअल इस्टेट व्यावसायिक आणि इतर व्यावसायिक उपस्थित होते.”
नमुने चाचणीसाठी पाठवले
डीसीपी योगेश गौतम पुढे म्हणाले, “या पार्टीत माजी आमदार पायलट रोहित रेड्डी, टीडीपीचे एलुरूचे खासदार पुट्टा महेश कुमार, रितेश रेड्डी, नमित मिश्रा, एम. रमेश, श्रवण कुमार, विजय कृष्णा, रवी आणि अर्जुन रेड्डी यांचा समावेश होता. पुढील तपासासाठी उपस्थित सर्वांचे अतिरिक्त नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण अहवाल आल्यानंतर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.”
खासदाराची चाचणीही पॉझिटिव्ह
ईगल फोर्सचे एसपी आर. गिरिधर पुढे म्हणाले, “आम्ही सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर संबंधितांना रक्त तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पाच जणांव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे एकूण सहा जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांना स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील कारवाई ते करतील. तपासादरम्यान आम्हाला समजले की उपस्थितांपैकी एक व्यक्ती माजी आमदार आहे आणि दुसरा सध्याचा खासदार आहे. टीडीपीचे सध्याचे खासदार पुट्टा महेश कुमार यांची रक्त चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.”
११ जणांना ताब्यात घेतले
“आम्ही एका फार्महाऊसवर छापा टाकला, जिथे एक व्यक्ती शस्त्र वापरत असल्याची माहिती मिळाली होती. फार्महाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांना काही आवाज ऐकू आले. ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि पिस्तूल घेऊन असलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. दुसऱ्या व्यक्तीकडे काही रिकामे काडतुसेही आढळली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित सर्व ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांची ड्रग्ज चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये पाच जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली”, असे ईगल फोर्सचे एसपी आर. गिरिधर म्हणाले.
