Telangana Minister Wakiti Srihari Performs CPR: आयपीएस अधिकाऱ्यांचे खासगी सचिव अचनाक खाली कोसळल्यानंतर तेलंगणाच्या मंत्र्यांनी त्याच्यावर सीपीआर केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मंगळवारी सकाळी तेंलगणा विधानसभेच्या आवारात ही घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आयएएस अधिकारी नवीन मित्तल यांचे खासगी सचिव राजू अचानक खाली कोसळले. यावेळी तेलंगणाचे पशुसंवर्धन मंत्री वाकिटी श्रीहरी यांनी त्यांच्यावर तातडीने सीपीआर केला.
मंत्री वाकिटी श्रीहरी यांनी दाखवले प्रसंगावधान
राजू खाली कोसळल्याचे लक्षात येताच मंत्र्यांनी तात्काळ त्यांच्याकडे धाव घेतली आणि वैद्यकीय पथक दाखल होण्यापूर्वीच त्यांना सीपीआर व प्रथमोपचार दिले. मिळालेल्या माहितीनुसार, राजू यांची अवस्था बिकट असल्याचे पाहून श्रीहरी यांनी थोडाही विलंब न लावता तेलंगणा विधानसभेच्या आवारातच त्यांच्यावर सीपीआर केला. मंत्री श्रीहरी यांनी त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावून राजू यांना पुढील वैद्यकीय उपचार मिळावेत याची दखल घेतली.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजू यांना त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, पशुसंवर्धन मंत्री वाकिटी श्रीहरी यांच्या प्रसंगावधानाचे आणि सहकार्याच्या भावनेचे कौतुक केले जात आहे.
सीपीआर म्हणजे काय?
सीपीआर म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, ही एक जीवनरक्षक प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके आणि श्वास थांबल्यास ( म्हणजेच कार्डियाक अरेस्ट) संबंधित व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी ही क्रिया केली जाते. हृदयाचे कार्य सामान्य होत नाही किंवा वैद्यकीय मदत मिळत नाही, तोपर्यंत या प्रक्रियेद्वारे मेंदू आणि महत्त्वाच्या अवयवांना हाताने छातीवर दाब देऊन रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा होण्यास मदत केली जाते.
