Telangana Rangareddy six murder case bail suspect pocso crime: महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या व्यक्तीने शुक्रवारी रात्री बायको-मुलांसह सहा जणांची हत्या केली. ३५ वर्षीय या व्यक्तीने स्वतःच्या पत्नी व दोन मुलांसह पाठलाग केला म्हणून तक्रार करणाऱ्या १६ वर्षीय मुलीसह तिच्या आई आणि आजीचा देखील खून केला. १६ वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याचा आरोप त्याच्यावर असून, त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर गेल्या महिन्यात वैयक्तिक हमीपत्रावर त्याला जामीन मिळाला होता.
तक्रारदार मुलीसह, तिच्या आई आणि आजीला संपवले
हैद्राबादपासून जवळच्या अंतरावरच असणाऱ्या आरोपीच्या मूळ गावातच शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. हत्या करुन आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पाठलाग केल्याची तक्रार दाखल केलेल्या १६ वर्षीय मुलीच्या घरी संशयित रात्री पावणे अकराच्या सुमारास पोहोचला. दार वाजवल्यानंतर पीडितेच्या आईने दार उघडले, आणि संशयिताने पीडितेच्या आईवर चाकूने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर झोपेत असलेल्या पीडितेच्या ६० वर्षीय आजीची देखील हत्या केली, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने तेलंगणा पोलिसांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
१६ वर्षीय पीडित मुलीची निर्घृण हत्या
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात पुढे दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने १६ वर्षीय पीडितेला गाडीत खेचून गावातील तळ्याजवळ घेऊन जात चाकूने गंभीर वार केले यातच तिचा मृत्यू झाला. संशयिताने पीडितेचा मृतदेह तळ्याशेजारी सोडून घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, आरोपीने पीडितेच्या गतीमंद बहिणीला इजा पोहोचवली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राजू कुमार असे या ३५ वर्षीय आरोपीचे नाव आहे.
बायको-मुलांची हत्या
संशयिताने त्यानंंतर रात्री साडे अकरा वाजता स्वत:च्या घरी घेऊन ३१ वर्षीय पत्नीचा गळा चिरुन हत्या केली. त्याच पद्धतीने त्याने ४ वर्षीय आणि १८ महिन्यांच्या दोन मुलांचा देखील निर्घृण पद्धतीने खून केला. दोन्ही मुले झोपेत असताना त्याने त्यांची हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हत्या केल्यानंतर संशयिताने वडिलांना फोन करुन गुन्ह्याची कबुली दिली. संशयित कार घेऊन फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयिताचा शोध सुरु
तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात संबंधित संशयिताच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण, आरोपी अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याने अटकपूर्व जामिनाला अर्ज करुन जामीन मिळवला. सध्या पोलिस या संशयिताचा शोध घेत असून, त्याने या हत्या का केल्या या कारणाचा देखील शोध घेतला जात आहे.
