तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण अपघातात एका न्यूरोसर्जनचा होरपळून मृत्यू झाला. डॉक्टरांची कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर काही क्षणांतच कारने पेट घेतला. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आणि डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. मृत डॉक्टरांची ओळख डॉ. के. जगदीश बाबू अशी झाली आहे. ते खम्मम येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख तसेच तेथील रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत होते. याबद्दल सविस्तर वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

खम्ममहून हैदराबादला जात असताना अपघात

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. जगदीश बाबू रविवारी सकाळी सुमारे सव्वासात वाजता खम्ममहून हैदराबादच्या दिशेने कारमधून प्रवास करत होते. त्यांचे कुटुंब हैदराबादमध्ये राहते. सूर्यापेट जिल्ह्यातील पिल्ललामरीजवळ राष्ट्रीय महामार्ग – ३६५ बीबीवर त्यांची कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. धडक झाल्यानंतर कारने अचानक पेट घेतला.

काही मिनिटांत कार पूर्णपणे जळून खाक

खम्मम ग्रामीणचे सर्कल इन्स्पेक्टर जी. राजशेखर यांच्या माहितीनुसार, कार दुभाजकाला धडकल्यानंतर लगेचच आग लागली. काही मिनिटांत आगीने संपूर्ण वाहनाला वेढले. आगीमुळे डॉ. जगदीश बाबू कारमध्येच अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. कार पूर्णपणे जळून खाक झाल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सुरुवातीला मृताची ओळख पटवणे कठीण झाले.

झोप पूर्ण न झाल्याने नियंत्रण सुटल्याचा अंदाज

प्राथमिक तपासात झोप पूर्ण न झाल्यामुळे डॉ. जगदीश बाबू यांचे कारवरील नियंत्रण सुटले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून अपघाताच्या परिस्थितीची माहिती आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सूर्यापेटमधील काही डॉक्टरही घटनास्थळी पोहोचले. गंभीररीत्या जळालेला मृतदेह नंतर सूर्यापेट सरकारी जनरल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोलिसांनी डॉ. जगदीश बाबू यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास सुरू आहे.