तेलंगणातील सिद्दीपेट जिल्ह्यातील रामक्कापेटा गावातील शेतात ८ ऑगस्ट रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, चहाची टपरी चालवणाऱ्या ३८ वर्षीय रजिता आणि तिच्या १५ वर्षीय मुलाने मिळून दोन महिलांची हत्या केली असून, आणखी चार जणांच्या हत्येचा कट रचला होता. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
शेतात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह
८ ऑगस्ट रोजी रामक्कापेटा गावातील शेतात झुडपांमध्ये एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. मृतदेह एका मोठ्या पिशवीतून आणून शेतात टाकल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे हत्या दुसऱ्या जागेवर करून मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. चेहरा पूर्णपणे जळाला नसल्याने ४५ वर्षीय अथिकम विजया अशी मृतदेहाची ओळख पटली.
विजया राहत असलेल्या भूमपल्ली गावात चौकशी करताना पोलिसांना तिची शेजारी रजिता हिच्याबाबत माहिती मिळाली. रजिता आपल्या मुलाबरोबर गावात छोटी चहाची टपरी चालवत होती. तपासादरम्यान पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. मार्चमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बसवण्यात आलेल्या ‘सिद्दीपेट सुरक्षा नेत्रा’ या सीसीटीव्ही नेटवर्कमुळे पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला. फुटेजमध्ये रजिता आणि तिचा मुलगा दुचाकीवरून जाताना दिसले. त्यांच्या मध्ये एक मोठी आणि वजनदार पिशवी होती. मात्र परतताना ती पिशवी दिसत नव्हती. हीच पिशवी विजया यांच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या पिशवीसारखी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
महिलांना लक्ष्य करून लूटमार
पोलिसांच्या तपासानुसार, रजिता आणि तिचा मुलगा महिलांना लक्ष्य करत होते. चहाच्या टपरीवर बसून ते गावातील लोकांच्या हालचाली, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक वादांची माहिती घेत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यांचे पहिले लक्ष्य त्याच गावातील रहिवासी असलेली अन्नपूर्णा होती. जून २०२५ मध्ये सकाळी फेरफटका मारायला गेलेल्या अन्नपूर्णावर निर्जन ठिकाणी हल्ला करून तिचे पाच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र लुटण्यात आले. या हल्ल्यात ती बचावली पण या हल्ल्याच्या परिणामांतून ती अजून सावरलेली नाही.
मे महिन्यातील बेपत्ता महिलेच्या हत्येचाही उलगडा
तपासादरम्यान पोलिसांना २८ मे रोजी बेपत्ता झालेल्या कुंता रेखा या महिलेच्या प्रकरणाशीही रजिता आणि तिच्या मुलाचा संबंध असल्याचे आढळले. रेखा चहाच्या टपरीवर गेल्यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर तिचा मृतदेह पिशवीत भरून दुचाकीवरून अचमय्यापल्लीच्या जंगलात नेण्यात आला आणि जाळण्यात आला. जंगलातील घटनास्थळी पोलिसांना पिशवीचे काही अवशेष, हाडे आणि दात सापडले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पावसामुळे मृतदेह शेतात जाळला
विजयाच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह असलेली पिशवी पावसाच्या पाण्यामुळे अधिक जड झाल्याने आरोपींना जंगलात जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी मृतदेह शेतात नेला, त्यावर पेट्रोल टाकून आग लावली. मात्र पावसामुळे मृतदेह पूर्णपणे जळू शकला नाही. पोलिसांनी जवळच्या पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले असून, रजिता आणि तिच्या मुलाने कॅनमध्ये पेट्रोल खरेदी केल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला आहे.
‘दृश्यम’ चित्रपटातून घेतली प्रेरणा?
पोलिसांच्या माहितीनुसार, रजिता अनेकदा आपल्या मोबाईलमध्ये मग्न असायची आणि सोशल मीडियावर तेलुगू ‘ट्रू-क्राइम’ कार्यक्रम पाहत असे. तसेच ती ‘दृश्यम’ चित्रपटाची मालिका वारंवार पाहत असल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या मते, ती केवळ गुन्हेगारी कथा पाहत नव्हती, तर त्यातून प्रेरणा घेऊन गुन्ह्यांचे नियोजन करत होती.
सोन्या-चांदीसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी रजिता आणि तिच्या मुलाकडून ५.६१ तोळे सोन्याचे दागिने, ५३ तोळे चांदीचे दागिने, १ लाख ३ हजार रुपये रोख, दोन मोबाइल फोन आणि मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरलेली निळ्या रंगाची दुचाकी जप्त केली आहे. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरगुती हिंसाचाराची बळी ठरलेली महिला ते खुनाची आरोपी
पोलिसांच्या माहितीनुसार, रजिताचा पती डुब्बय्या मद्यपी होता आणि आपल्या पत्नीला मारहाण करण्यात त्याला आनंद मिळत असे. अनेक वर्षे हा छळ सहन केल्यानंतर, सुमारे दोन वर्षांपूर्वी एका रात्री रजिताने डुब्बय्याच्या पायावर उकळते पाणी ओतल्याचा आरोप आहे. या घटनेत तो ८० टक्के भाजला आणि त्याच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला. ही घटना घडली असली, तरी डुब्बय्या अजूनही त्याच घरात राहतो.
आणखी चार हत्यांचा कट?
तपासात रजिताने आणखी चार हत्यांचा कट रचल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. तिच्या मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून रजिताविरोधात दुहेरी हत्या आणि गंभीर दुखापत केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजिताच्या पतीनेही माध्यमांशी बोलताना, “तिने मलाही मारण्याचा प्रयत्न केला होता,” असा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी त्याच्या सहभागाची शक्यता नाकारलेली नाही. तो अजूनही संशयित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
