मेघालयमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणि पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडालेली असतानाच आता तेलंगणामधून एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने आरोप केला आहे की त्याच्या पत्नीने आणि तिच्या कथित प्रियकराने आपल्याला जीवे मारण्याचा कथित कट रचला आहे. या कटाचा उलगडा करणारे काही व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील चॅट्स आढळून आल्याचा दावाही पतीने केला आहे.

पत्नीने तिच्या कथित प्रियकराला पतीचा रस्ते अपघाताचं नाटक करून संपवण्याचा कट रचल्याचा आरोप पतीने केला आहे. पत्नी आणि तिचा कथित प्रियकर यांच्यातील या कटाच्या संभाषणाचे व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील चॅट्स आपल्याला आढळून आल्याचा दावा पतीने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

तेलंगणातील एका व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेत त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याची पत्नी एका कुरिअर डिलिव्हरी एजंट असलेल्या कथित प्रियकराच्या मदतीने आपली (पतीची) हत्या करण्याचा कट रचत होती, असा आरोप पतीने केला आहे. मात्र, जेव्हा आपण पत्नीचा फोन तपासला तेव्हा त्यात तिचे आणि तिच्या कथित प्रियकराचे व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील संभाषण आढळून आल्याचा दावा पतीने केला आहे.

आरोप करणारा हा व्यक्ती महेबूबाबाद जिल्ह्यातील आहे. २०१६ मध्ये या दाम्पत्याचा विवाह झाला होता आणि त्यांना दोन मुलीही आहेत. तसेच हा व्यक्ती एका खासगी रुग्णालयात काम करतो. मात्र, २७ जुलै रोजी दुपारच्या जेवणासाठी तो घरी परतला तेव्हा त्याला पत्नी आणि तिचा कथित प्रियकर हे एकत्र आढळून आल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.

दरम्यान, पतीने काही कथित स्क्रीनशॉट्स शेअर केले असून त्यामध्ये पत्नी आणि तिचा कथित प्रियकर हे आपल्याला जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप पतीने केला आहे. तक्रारीत असाही आरोप करण्यात आला की, पत्नीने तिच्यावर संशय येऊ नये म्हणून आपल्या पतीचा रस्ते अपघात मृत्यू झाल्याचं भासवून मारण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पत्नीने प्रियकराला सांगितलं की, “जर तू माझ्या पतीला मारलं नाही, तर मी स्वतः मारेन”, असा आरोप पतीने केला. या व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच काही कथित स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत.

कथित चॅट्सची पोलीस तपासणी करणार

दरम्यान, पोलीस आता कथित व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम चॅट्समधील संभाषणांची तपासणी करत त्याची सत्यता पडताळून पाहणार आहेत. तसेच पत्नी आणि तिचा कथित प्रियकर यांनी खरंच कथित कट प्रत्यक्षात आणण्याचा काही प्रयत्न केला होता का? याचीही चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती सांगण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.