इमारतीवरून धक्का मारून जीवे मारण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर तेलंगणातील एका महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराबरोबर मिळून स्वतःच्या नवऱ्याची हत्या केली. इमारतीवरून ढकलल्यानंतरही पतीचा जीव वाचल्याने उपचारादरम्यान त्याला टॉयलेट क्लिनर आणि इतर द्रव्ये इंजेक्शनद्वारे दिल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना निजामाबादमधील न्यालकाल गावामध्ये घडली.
परदेशातून परतलेल्या पतीला मारायचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय प्रशांत २७ जूनला गुल्फवरून घरी परतला होता. त्याची पत्नी संध्या हिचे अनिल याच्याशी विवाहबाह्य संबंध होते. यामुळे प्रशांत त्यांच्यामध्ये अडथळा बनत होता.
मद्यधुंद अवस्थेत असताना इमारतीवरून धक्का
संध्याने तिचा प्रियकर अनिलचा मित्र असलेल्या वेंकट साई उर्फ बंटी याची मदत घेतली. बंटीला प्रशांत बरोबर पार्टी करण्यास सांगितले. तसेच पतीला भरपूर मद्य पाज, अशीही सूचना तिने दिली. २९ जून रोजी दोघे इमारतीच्या गच्चीवर मद्य रिचवत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर बंटी आणि संध्या यांनी मिळून प्रशांतला गच्चीवरून खाली ढकलल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला सरकारी रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नर्स असलेल्या पत्नीचा हत्येचा दुसरा प्रयत्न
पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ३० जूनला नर्स असलेल्या संध्याने तिच्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर केला. पोलिसांच्या माहितीनुसार प्रशांतचा उपचार सुरु असताना त्याच्या कॅन्युलातून (औषध किंवा सलाईन रक्तवाहिनीमध्ये सोडण्यासाठी हातावर किंवा दंडावर लावली जाणारी पातळ नळी) टॉयलेट क्लिनर आणि इतर पदार्थ शरीरात सोडण्यात आले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
प्रशांतच्या आईला संशय आल्याने १ जुलै रोजी तिने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार घडकीस आला.
चौकशीदरम्यान कबुली
पोलिसांच्या चौकशीदरम्यान बंटीने प्रशांतवरील हल्ल्यात सहभाग असल्याचे कबूल केले. चौकशीदरम्यान त्याने, “आमच्यात भांडण झाले. त्यानंतर त्याची पत्नी आली आणि आम्ही दोघांनी मिळून त्याला ढकलले,” अशी कबुली त्याने दिली. तसेच, “हा तिचाच प्लॅन होता. तिने मला पैसे दिले,” असेही त्याने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र हे दावे अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.
तिघांवर कारवाई
४ जुलै रोजी पोलिसांनी संध्या, तिचा प्रियकर अनिल आणि वेंकट साई उर्फ बंटी यांना अटक केली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
