Why WhatsApp Not Banned: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट यूजी फेरपरीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या तक्रारीनंतर केंद्र सरकारने टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर बंदी घातल्याची घोषणा केली. २१ जून रोजी नीट यूजी परीक्षा होणार आहे. त्यामुळे २२ जूनपर्यंत ही बंदी असेल, असे सांगितले जात असले तरी ही बंदी पूर्णपणे अमलात आलेली नाही. यामुळे भारताच्या तांत्रिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच टेलिग्रामपेक्षा अधिक लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲपला यातून का वगळण्यात आले? असाही एक प्रश्न उभा राहिला आहे.

६ मे रोजी नीट यूजीची परीक्षा झाली होती. मात्र टेलिग्रामचा वापर करून प्रश्नपत्रिका फोडली गेली, असा आरोप झाला. त्यामुळे २१ जून रोजी फेरपरीक्षा होत आहे. मात्र काही दिवसांपासून पुन्हा एकदा सोशल मीडियावर नीट परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याची जोरदार अफवा पसरली होती. काही बनावट प्रश्नपत्रिकांचे फोटोही व्हायरल होत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

टेलिग्रामवर बनावट प्रश्नपत्रिका पसरू नयेत, तसेच अपप्रचार होऊ नये, यासाठी एनटीएच्या मागणीनंतर केंद्र सरकारने टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. वरकरणी पाहता सरकारचा निर्णय तार्किक वाटत असला तरी त्यावरून काही प्रश्न निर्माण होतात. फक्त टेलिग्रामच का? व्हॉट्सॲपवर बंदी का नाही?

टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर हे दोन्ही मेसेजिंग ॲप्स आहेत. भारतात दोन्ही लोकप्रिय असून त्यांच्या सेवा जवळपास समान आहेत. तरीही व्हॉट्सॲप वगळून केवळ टेलिग्रामवर बंदी घालण्यात आली आहे.

एनटीएने काय म्हटले?

व्हॉट्सॲपवर कोणतीही बंदी घातलेली नाही, हे जाणून घेण्यासाठी आधी टेलिग्रामवर काय चालते, हे समजून घ्यावे लागेल. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, Paper Leaked Neet, Re-Neet 2026 आणि Private Mafia यासारखे टेलिग्राम चॅनेल नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याची उघडपणे जाहिरात करत होते. या बदल्यात उमेदवारांकडून लाखो रुपयांची मागणी केली जात होती.

टेलिग्रामवरील अनेक चॅनेल आणि ग्रुप्स बंद करण्यासह इतर काही युक्त्या वापरूनही पेपरफुटीच्या अफवा कायम राहिल्या. त्यामुळे एनटीएने या ॲपवरच बंदी घालण्याची शिफारस केली.

पण जर समस्या टेलिग्रामवरील ग्रुप्स आणि चॅनेलची असेल तर हे आरोपी व्हॉट्सॲपवरही त्याप्रकारचे ग्रुप्स तयार करू शकतात, असा प्रश्न सर्वांना पडू शकतो. पण तसे करणे तितके सोपे नाही.

टेलिग्रामवर फसवणूक कशी होते?

सामान्यांच्या दृष्टीने टेलिग्राम हे सर्वात सुरक्षित मेसेजिंग ॲप नाही. व्हॉट्सॲपसारख्या प्लॅटफॉर्मवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असते. तर टेलिग्रामवर तुम्ही स्वत: हून पर्याय निवडल्याशिवाय मेसेज एन्क्रिप्ट केले जात नाहीत. (याला अपवाद गुप्त संदेशाचा आहे)

पेपरफुटीसारख्या प्रकारात टेलिग्राम हेच सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे. टेलिग्राम ॲप ज्याप्रकारे तयार करण्यात आले आहे, त्यावरून त्याचा वापर अशा कृत्यांसाठी केला जात असावा, अशी अटकळ बांधली जाते. टेलिग्राम ॲपवर आपली ओळख लपवून अनामिक राहता येते. तुम्ही जेव्हा टेलिग्रामवर तुमचे प्रोफाइल तयार करता, तेव्हा तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर इतर वापरकर्त्यांपासून लपवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी केवळ युजरनेम वापरावे लागेल.

व्हॉट्सॲपही अशाच एका फिचरवर सध्या काम करत आहे. पण हे फिचर सर्व युजर्ससाठी अद्याप खुले करण्यात आलेले नाही.

टेलिग्रामवर एकदा का आपले प्रोफाइल तयार झाले की, तुम्ही अनामिक राहून तुमचे चॅनेल सुरू करू शकता. ज्याचे अगणित सबस्क्राइबर असू शकतात. यामुळे अनेक लोक आपली खरी ओळख लपवून लाखो सबस्क्राइबरचे चॅनेल चालवू शकतात. यामुळे व्हॉट्सॲपच्या तुलनेत टेलिग्रामवर एखादे चॅनेल नेमके कोण चालवत आहे, याचा शोध घेणे अवघड होते.

गोपनियतेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सिग्नल हे ॲप सर्वात सुरक्षित मानले जाते. मात्र पेपर फोडणारे आरोपी सिग्नलचा वापर करताना दिसत नाहीत. याचीही अनेक कारणे आहेत. टेलिग्रामवर फाईल शेअर करण्याव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी करता येतात. येथे २ जीबीपर्यंतच्या फाईल्स शेअर करता येतात. यामुळेच अनेक चित्रपट आणि वेब सीरीज टेलिग्रामवर लिक झाल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात.

टेलिग्रामवर असलेले आणखी फिचर पेपर फोडणाऱ्या आरोपींकडून वापरले जाते. टेलिग्रामवर जुने मेसेज एडिट करण्याची सोय आहे. एनटीएच्या माहितीनुसार, चॅनेल तयार करणारे ॲडमिन जुने मेसेज एडिट करून त्याठिकाणी पीडीएफ फाईल जोडतात. टेलिग्रामचे हे एडिटिंग फिचर भारतात ३० जून पर्यंत बंद करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲपवरही अशाप्रकारचे एडिटिंग फिचर आहे. मात्र मेसेज केल्यापासून काही ठरावित काळानंतर तो मेसेज एडिट करता येत नाही.

व्हॉट्सॲप सर्वात सुरक्षित असण्याचे कारण काय?

टेलिग्रामचे निर्माते पावेल डुरोव्ह हे कोणत्याही सरकारशी सहकार्य करण्याची भूमिका मानत नाहीत. त्यामुळेच गैरकृत्य करणाऱ्यांसाठी टेलिग्राम सुरक्षित स्थान आहे.

व्हॉट्सॲप आणि एक्स सारखे प्लॅटफॉर्म हे भारत सरकारने दिलेल्या सूचना पाळत आले आहेत. टेलिग्रामचे भारतात कार्यालयही नाही. त्यामुळेच जेव्हा यंत्रणांना काही शोध घ्यायचा असल्यास टेलिग्रामशी संवाद साधणे अवघड होते.

बंदी असूनही भारतात टेलिग्राम ‘ॲक्टिव्ह’

दरम्यान केंद्र सरकारने टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी घातली असली तरी ती पूर्णपणे लागू झालेली नाही. अनेकांच्या मोबाइलवर अद्यापही टेलिग्रामचा वापर सुरू आहे. भारताने यापूर्वी टिकटॉक आणि पबजीसह इतर ॲप्सबाबत जशी बंदी घातली होती, त्याप्रमाणे टेलिग्रामवर निर्बंध घालता आलेले नाहीत.