Telegram CEO Pavel Durov on NEET Paper Leak: भारतात NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर घालण्यात आलेल्या आठवड्याभराच्या बंदीवर कंपनीचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पावेल दुरोव्ह यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “सरकारच्या या निर्णयामुळे देशातील १५ कोटींहून अधिक सामान्य युजर्सना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,” असा दावा दुरोव्ह यांनी केला आहे. तसेच, “बंदी घालून पेपर लीक थांबलेले नाही, तर ते आता इतर अॅप्सवर सुरू झाले आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
१५ कोटी सामान्य युजर्सना शिक्षा का? पावेल दुरोव्ह यांचा प्रश्न
पावेल दुरोव्ह यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत भारतीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (IT Ministry) या कारवाईवर बोट ठेवले आहे.
“भारतात काही युजर्सनी परीक्षेचे लीक झालेले पेपर्स शेअर केले, म्हणून सरकारने टेलिग्रामवर एका आठवड्याची बंदी घातली. हा निर्णय म्हणजे देशातील १५ कोटींपेक्षा जास्त सामान्य टेलिग्राम युजर्सना शिक्षा देण्यासारखा आहे. ज्यांनी प्रत्यक्षात पेपर लीक केले, त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. या बंदीमुळे मूळ समस्या सुटलेली नाही, कारण पेपर लीकचे हे रॅकेट आता इतर अॅप्सवर शिफ्ट झाले आहे,” असे दुरोव्ह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी कारवाई
देशात वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या ‘NEET UG 2026’ परीक्षेच्या घोळानंतर केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे. २१ जून रोजी होणाऱ्या नीटच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, २२ जूनपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) शिफारशीवरून माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या तात्पुरत्या बंदीमुळे कोट्यवधी युजर्सची गैरसोय होत असल्याबद्दल ‘एनटीए’ने दिलगिरी व्यक्त केली आहे.
मेसेज एडिट करण्याच्या फीचरवरही ३० जूनपर्यंत बंदी
फक्त बंदीच नाही, तर सरकारने टेलिग्रामला ३० जूनपर्यंत त्यांचे अत्यंत लोकप्रिय असलेले ‘मेसेज एडिटिंग’ (Message-Editing) फीचर भारतात पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या फीचरचा गैरवापर कसा व्हायचा?
- बनावट पुरावे: ‘एनटीए’ने दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामच्या या फीचरचा गैरवापर करून पेपर लीक झाल्याचे खोटे पुरावे तयार केले जात होते.
- टाईमस्टॅम्पचा गैरफायदा: चॅनलचे अॅडमिन आधी पाठवलेल्या मेसेजची वेळ (Timestamp) तीच ठेवून, त्यातील मजकूर आणि पीडीएफ (PDF) फाईल्स बदलत असत.
- फसवणूक: परीक्षा झाल्यानंतरही, “आमच्याकडे पेपर आधीच आला होता” असा बनाव रचून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी या फीचरचा वापर केला जात असल्याचा संशय आहे.
टेलिग्राम बनले होते ‘पेपरफुटी रॅकेट’चे मुख्य केंद्र!
२१ जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्रिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये म्हणून सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे. टेलिग्रामवर सक्रिय असलेल्या विविध टोळ्या (Cheating Rackets) परीक्षार्थींना खोटे पेपर देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले होते.
यापूर्वी प्रशासनाने टेलिग्रामवरील अनेक संशयास्पद चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्स (Bots) डिलीट केले होते. मात्र, तरीही हे प्रकार थांबत नसल्याने अखेर संपूर्ण प्लॅटफॉर्मवरच तात्पुरती बंदी घालण्याचा टोकाचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. दरम्यान, इंटरनेटवरील अशा तात्पुरत्या बंदीमुळे मूळ समस्येचे निवारण होते की नाही, यावर आता डिजिटल विश्वात एक नवी चर्चा सुरू झाली आहे.
