नवी दिल्ली : मोदी ३.० सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील कळीची खाती पदरात पाडून घेण्यासाठी तेलुगु देसम व संयुक्त जनता दल (जेडीयू) या दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या भाजपशी शुक्रवारी तीव्र वाटाघाटी सुरू होत्या. तेलुगु देसमने लोकसभाध्यक्ष पदासह माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाची तर जनता दलाने रेल्वे मंत्रालयाची मागणी केल्याचे समजते. कृषि मंत्रालयावर दोन्ही जनता दलांनी दावा केला आहे. भाजपवर घटक पक्षांनी दबाव वाढवला असला तरी, विविध क्षेत्रांतील पायाभूत विकासांची मंत्रालये सोडण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळे खातेवाटपाची गुंतागुंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गृह, अर्थ, संरक्षण व परराष्ट्र संबंध ही चार अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यावर भाजप ठाम असून लोकसभाध्यक्षपदबाबतही तडजोड केली जाणार नसल्याचे समजते. तेलुगु देसमला लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते.

गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने पायाभूत विकासाला मोठी चालना दिली असून आगामी काळात आर्थिक विकासाचा वेग वाढवला जाईल. त्यामुळे रस्तेविकास, रेल्वे, बंदरविकास, माहिती-तंत्रज्ञान, वाणिज्य ही खाती घटक पक्षांना देणे परवडणारे नाही. याशिवाय माहिती-प्रसारण, समाजकल्याण, महिला बालकल्याण, क्रीडा व युवा तसेच कृषी व ही खाती लोककल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची असल्याने त्यावरील दावाही भाजप सोडणार नसल्याचे समजते. या मंत्रिमंडळातील राज्यमंत्रीपदे तेलुगु देसम व जनता दलाला दिली जाऊ शकतील.

हेही वाचा >>>सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा; संसदीय समिती चौकशीची मागणी; राहुल यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

नागरी विमान वाहतूक, पंचायत राज, नागरी पुरवठा, लघु उद्याोग, अवजड उद्याोग, कौशल्य विकास, भूविज्ञान, कामगार कल्याण, विज्ञान-तंत्रज्ञान या मंत्रालयांतील केंद्रीय मंत्रिपदे घटक पक्षांना दिली जातील. शिवसेनेच्या शिंदे गटाची अवजड उद्याोग मंत्रालयाची मागणी मान्य केली जाण्याची शक्यता आहे.

तेलुगु देसमने चार, जनता दलाने (सं) तीन केंद्रीय मंत्रीपदाची मागणी केली आहे. चिराग पासवान व शिंदे गटाने एक केंद्रीय मंत्रिपद व एका राज्यमंत्रीपदावर दावा केल्याचे सांगितले जाते. चार खासदारांमागे एक केंद्रीय मंत्रिपद असे खातेवाटपाचे सूत्र निश्चित झाल्याचे सांगितले जाते. अजित पवार गटाचा एकच खासदार जिंकून आला असला तरी प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते. रामदास आठवलेंनाही सामावून घेतले जाऊ शकते. त्यामुळे हे सूत्र लागू होण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटक पक्षांशी खातेवाटपाच्या चर्चेची जबाबदारी अमित शहा, राजनाथ सिंह व जे. पी. नड्डा यांच्यावर सोपवली आहे. या तिन्ही नेत्यांनी गुरुवारी घटक पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. या प्रक्रियेमध्ये पीयुष गोयल, प्रल्हाद जोशी, तरुण चुग हे नेतेही सहभागी झाले होते.

घटक पक्षांच्या खात्यांच्या मागण्या

● तेलगु देसम : लोकसभाध्यक्ष, रस्तेविकास, पंचायत राज, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान व शिक्षण

● संयुक्त जनता दल : कृषि, रेल्वे, पंचायत राज, ग्रामीण विकास

● जनता दल (धर्मनिरपेक्ष) : कृषि, पंचायत राज, नागरी पुरवठा, ग्रामीण विकास

● शिवसेना शिंदे : अवजड उद्याोग

(लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे गुरुवारी नवी दिल्लीत सोपवली.)