Women Rapes Pretext Lifting a Curse: आध्यात्मिक समाधान मिळविण्यासाठी बंगळुरूतील ३८ वर्षीय महिला केरळच्या मंदिरात गेली होती. मात्र पीडितेच्या अडचणी दूर करण्याच्या नावाखाली मंदिर व्यवस्थापकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. शाप दूर करण्याच्या बहाण्याने आरोपीनं हे धक्कादायक कृत्य केलं. यानंतर पोलिसांनी ४० वर्षीय आरोपी अरुण टीए याला पेरिंगोट्टुकारा मंदिरातून अटक केली. तर सहआरोपी असलेला मंदिराचा पुजारी उन्नी दामोदरन फरार आहे.
केरळमधील मंदिराची ऑनलाईन माहिती मिळाल्यानंतर पीडित महिलेनं मार्च महिन्यात तीन मित्रांसह या मंदिराला भेट दिली होती. आता तिनं बेलंदूर पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल केली. पीडितेवर जादूटोणा झाल्याचं भासवून अरुण आणि मंदिरातील पुजाऱ्यानं विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर वारंवार अत्याचार केला, असा आरोप महिलेनं आपल्या तक्रारीत केला.
२०१६ मध्ये पीडितेच्या पतीचं निधन झाल्यानंतर ती दोन मुलांचं संगोपन एकटीच करत होती. हे करत असताना तिला वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. पीडितेनं तक्रारीत म्हटलं की, खास विधी केल्यानंतर तिच्यावरील शाप दूर होईल आणि तिच्या आयुष्यातील समस्यांपासून तिला मुक्तता मिळेल, असा विश्वास दोन्ही आरोपींनी दिला होता.
या विधीसाठी पीडितेनं सुरुवातीला २४ हजार रुपये दिले. त्यानंतर आणखी पैसे देता येणार नाही, असेही पीडितेनं सांगितलं होतं. त्यावर आरोपी अरुणनं पुढील खर्च स्वतः करण्याची तयारी दर्शवली. मात्र अरुणचे आश्वासन पुढे धमकी आणि दहशतीत बदलले.
अरुण तिला वारंवार फोन करून धमकवत असे. तसेच व्हिडीओ कॉलवर त्याच्य सुचनांचं पालन करण्याची बळजबरी करत असे. “आरोपी अरुण मला ‘आय लव्ह यू’चा मेसेज करायचा. केरळच्या मंदिरात भेट देण्याआधी वेळ आधीच सांगण्यास अरुणनं सांगितलं होतं. त्याप्रमाणे तो मंदिरात खोली बुक करायचा”, अशी माहिती पीडितेनं तक्रारीत दिली.
पोलिसांमधील सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, अरुणने एकदा व्हिडीओ कॉलवर पीडितेला विवस्त्र होण्यास सांगितलं. असं केलं नाही तर ती कधीही जादुटोण्यापासून मुक्त होणार नाही, अशी धमकी तिला दिली. जेव्हा असं करण्यास पीडितेनं नकार दिला, तेव्हा अरुणने तिचा खासगी व्हिडीओ त्याच्याकडे असल्याचे सांगितलं. तसेच दोन्ही मुलांवर काळी जादू करून त्यांना इजा पोहोचवण्याची धमकी दिली.
१० मे रोजी पीडितेने मंदिराला भेट दिली. तेव्हा अरुणने तिला मंदिर परिसरातील एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यावेळी मंदिराचा पुजारी दामोदरन हा बाहेर पहारा देत होता. २१ मे रोजी पुन्हा एकदा अरुणने पीडितेला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडितेने नाईलाजाने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अरुणला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.