scorecardresearch

अमेरिकेत गोळीबारात दहा नागरिक ठार; चिनी नववर्ष सोहळय़ात हिंसाचार

लॉस एंजेलिस परिसरातील बॉलरूम डान्स क्लबमध्ये चिनी चांद्र नववर्ष उत्सवानंतर झालेल्या गोळीबारात दहा नागरिक ठार झाले, तर दहा जण जखमी झाले.

अमेरिकेत गोळीबारात दहा नागरिक ठार; चिनी नववर्ष सोहळय़ात हिंसाचार
अमेरिकेत गोळीबारात दहा नागरिक ठार

वृत्तसंस्था, मॉन्टेरे पार्क (अमेरिका) : लॉस एंजेलिस परिसरातील बॉलरूम डान्स क्लबमध्ये चिनी चांद्र नववर्ष उत्सवानंतर झालेल्या गोळीबारात दहा नागरिक ठार झाले, तर दहा जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार झाला तेव्हा तेथे हजारो नागरिक उपस्थित होते. गोळीबारानंतर झालेल्या गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोराने पलायन केले. त्याच्या अटकेसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

हल्लेखोराविषयी माहिती मिळवणे कठीण जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. हे हत्याकांड द्वेष भावनेतून घडवण्यात आल्याचा निष्कर्ष काढणे घाईचे होईल, असेही अधिकारी म्हणाले.  प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, अचानक एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यामुळे लोक सैरावैरा धावत सुटले. 

मॉन्टेरे पार्क हे लॉस एंजेलिसपासून १६ किलोमीटरवर असलेले सुमारे ६० हजार लोकसंख्येचे शहर आहे. तेथे आशियाई नागरिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. ‘क्लॅम हाऊस’ या सागरी खाद्यपदार्थाच्या ‘बार्बेक्यू’ उपाहारगृहाचे मालक सेंग वोन चोई यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार सुरू असताना त्यांच्या उपाहारगृहात तीन जण घुसले आणि त्यांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले.

महिन्यातील पाचवी घटना

उपलब्ध आकडेवारीनुसार अमेरिकेत या महिन्यात झालेल्या सामूहिक हत्याकांडापैकी ही पाचवी मोठी घटना आहे. गेल्या वर्षी टेक्सासमधील उवाल्डे येथील शाळेत २१ जणांच्या हत्येनंतरचे हे सर्वात मोठे सामूहिक हत्याकांड आहे. कोलोरॅडो स्प्रिंग्स नाइट क्लबमध्ये पाच जणांची हत्या झाल्यानंतर दोन महिन्यांनी हा हिंसाचार घडला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या