संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओ या संस्थेचे दहा प्रमुख प्रकल्प रखडले असून, त्यात तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या निर्मितीचा प्रकल्पही समाविष्ट आहे अशी माहिती लोकसभेत संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिली. या प्रकल्पांना विविध कारणांनी विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डीआरडीओच्या प्रकल्पांना होत असलेल्या विलंबाबाबत संरक्षणमंत्री जेटली यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले, की विलंबाची कारणे दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या व्यतिरिक्त नौदलाचे हलके लढाऊ विमान, एरो इंजिन कावेरी, हवाई सतर्कता यंत्रणा व नियंत्रण विमान, लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र यांचा त्यात समावेश आहे.
हवेतून हवेत मारा करणारे अस्त्र क्षेपणास्त्र, हलके टॉर्पेडो, दुरंगी क्षेपणास्त्र सूचक यंत्रणा हे इतर प्रकल्पही रखडले आहेत. या प्रकल्पांना लागणारे सुटे भाग तयार करण्यासाठी वेगळा दृष्टिकोन अवलंबण्यात येईल. डीआरडीओ मागे पडत आहे व सरकार त्यांना पाठिंबा देत नाही असा एक समज आहे, पण तो खरा नाही असे ते म्हणाले. निधीअभावी डीआरडीओच्या सेवांमध्ये कपात करणे योग्य होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.