पीटीआय, इम्फाळ : मणिपूरमध्ये बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून राज्यात विविध ठिकाणी बुधवारी विद्यार्थी आणि स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. इम्फाळमध्ये विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी मोर्चे काढले. चुराचांदपूर येथे इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमच्या (आयटीएलएफ) महिला शाखेने सीबीआय तपासाला होणाऱ्या विलंबाविरोधात आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या एका मोर्चाला हिंसक वळण लागून सुरक्षारक्षकांशी झालेल्या झटापटीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
दोन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्येविरोधात इम्फाळमधील हाऊ मैदानातून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. ‘आम्हाला न्याय हवा’, अशा घोषणा देत हा मोर्चा मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जात होता. मोर्चा निवासस्थानापासून २०० मीटर अंतरावर मोइरांगखोम भागात असताना काही विद्यार्थ्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या अनेक नळकांडय़ा फोडल्या. या संघर्षांत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘विद्यार्थ्यांच्या मारेकऱ्यांना २४ तासांच्या आत अटक झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आमचे गाऱ्हाणे ऐकून घ्यावे यासाठी आम्हाला त्यांची भेट मिळाली पाहिजे,’ अशी मागणी विद्यार्थी नेता लान्थेन्ग्बा याने केली. तर आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. राज्याच्या अन्य भागांमध्येही विद्यार्थ्यांनी काळय़ा फिती बांधून घोषणाजी केली.




तपासाला विलंबाविरोधात कुकी महिला रस्त्यावर चुराचांदपूर येथे आयटीएलएफच्या महिला शाखेने निदर्शने केली. राज्यात जवळपास पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारादरम्यान आदिवासींवर झालेले बलात्कार आणि त्यांच्या हत्यांच्या सीबीआय तपासात होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनांदरम्यान कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी संपूर्ण इम्फाळ खोऱ्यात पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जलद कृतीदल (आरएएफ) कर्मचारी मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आले.
काँग्रेसची पंतप्रधानांवर टीका
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमधील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. राज्यातील अकार्यक्षम सरकार तातडीने हटवण्याची मागणीही त्यांनी केली. भाजपमुळे राज्याचे रूपांतर युद्धभूमीत झाले असून महिला व मुलांविरोधातील हिंसेचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे अशी टीका खरगे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून केली.
सीबीआय तपास सुरू
दोन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्येचा तपास मुख्यमंत्री सिंह यांनी सीबीआयकडे सोपविल्यानंतर विशेष संचालक अजय भटनागर इम्फाळमध्ये दाखल झाले असून त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा तपास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून इम्फाळमध्येच असलेले सीबीआयचे सहसंचालक धनश्याम उपाध्याय यांचादेखील भटनागर यांच्या पथकात समावेश करण्यात आला आहे. बुधवारपासूनच तपासाला सुरुवात केली जात असल्याचेही सांगण्यात आले. मणिपूर सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर काही तासांमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
काय घडले?
फिजम हेमजित (२०) हा विद्यार्थी आणि हिजम लिंथोगम्बी (१७) ही विद्यार्थिनी ६ जुलैपासून बेपत्ता होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात पसरविली गेली. एका छायाचित्रात दोघे काही सशस्त्र व्यक्तींबरोबर असल्याचे दिसते, तर दुसऱ्या छायाचित्रात त्यांचे मृतदेह आहेत. हे दोघेही मैतेई समाजातील आहेत. दोघांच्या मोबाइलचे अखेरचे स्थान चुराचांदपूर जिल्ह्यातील लामदन हे पर्यटनस्थळ आहे. यासह अन्य पुराव्यांच्या आधारे सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ
इम्फाळ खोरे तसेच आसाम सीमेलगत असलेल्या १९ पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र वगळता संपूर्ण मणिपूरमध्ये सशस्त्र दले (विशेष) कायद्याला म्हणजेच ‘अफ्स्पा’ला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ‘अफ्स्पा’मधून वगळण्यात आलेला भाग हा मैतेईबहुल असल्याने यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये घुसलेल्या समाजकंटकांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने लोखंडी वस्तू फेकल्याची माहिती आहे. मात्र जवानांकडून जीवघेण्या शस्त्रांचा वापर केला गेला असेल, तर त्याची चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. आंदोलने शांततेत आणि संवेदनशील भाग टाळून केली गेली पाहिजेत. – एन. बिरेन सिंह, मुख्यमंत्री, मणिपूर