राजस्थानमधील भिलवाडा येथे २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी दुसऱ्या समाजातील काही लोकांनी तरुणाची हत्या केली. हल्ल्यानंतर विश्व हिंदू परिषद, भाजपा आणि हिंदू जागरण मंचने भिलवाडा बंदची हाक दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पैशांवरुन झालेल्या भांडणानंतर काही मुलांनी २२ वर्षीय आदर्शवर हल्ला केला आणि त्याला जखमी केलं. जिल्हा रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान ११ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून इंटरनेट २४ तासांसाठी बंद करण्यात आलं आहे.

विश्व हिंदू परिषदेचे गणेश प्रजापत म्हणाले आहेत की, “भिलवाडामध्ये वारंवार जातीय घटना समोर येत आहेत”. दरम्यान त्यांनी तरुणाच्या कुटुंबाला ५० लाख रुपये देण्याची आणि सर्व आरोपींना अटक केलं जावं अशी मागणी केली आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे.

“ही अत्यंत लाजिरवाणी घटना असून पोलीस आणि सरकारला झोपेतून जागी करणारी आहे,” असं भाजपा आमदार विठ्ठल अवस्थी म्हणाले आहेत.