एपी, पॅरिस
पॅरिसमध्ये निवृत्तिवेतनाच्या मुद्दय़ावरून निदर्शने सुरू आहेत आणि यामध्ये पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरून वाद उद्भवला आहे. पोलीस नागरिकांना शांततेत निदर्शने करू देत आहेत असा दावा सरकारतर्फे करण्यात येत आहे तर पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकारांचे उल्लंघन करत निदर्शकांवर अकारण कठोर कारवाई केली असल्याचा आरोप मानवाधिकार कार्यकर्ते आणि निदर्शक करत आहेत.




पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेकांना शारीरिक इजा झाली, तसेच शिवराळ भाषेचाही वापर केला जात असल्याचे आरोप होत आहेत. यासंबंधीचे व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात समाजमाध्यमांवर पसरत आहेत. पोलीस स्टन ग्रेनेड आणि रबरी गोळय़ांसारम्ख्या हत्यारांचा वापर करत आहेत, या हत्यारांवर इतर युरोपीय देशांनी बंदी घातलेली आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलसारख्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनीही या प्रकारांची दखल घेतली असून त्यामुळे पोलिसांची ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी मॅक्रॉन यांचे सरकार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे पोलिसांच्या आक्रमकपणामुळे संतप्त कामगार संघटनांनी येत्या गुरुवारपासून पुढील निदर्शने करण्याचे जाहीर केले आहे.
आंदोलनाचे कारण
अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी निवृत्तीचे वय वाढवण्याचा तसेच निवृत्तिवेतनासंबंधी नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जानेवारीपासून फ्रान्समध्ये निदर्शने सुरू आहेत. नवीन नियमांनुसार, पूर्ण निवृत्तिवेतन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना जास्त काळ काम करावे लागणार आहे.