टय़ुनिसच्या दक्षिणेकडे १४० किलोमीटर अंतरावरील सोऊस्से येथील समुद्रकिनाऱ्यानजीक असलेल्या ‘मरहबा हॉटेल’वर बंदूकधारी इसमांनी शुक्रवारी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २८ जण ठार झाले असून त्यामध्ये काही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे म्हटले आहे. या गोळीबारानंतर त्या परिसरात गोंधळ आणि मोठय़ा प्रमाणावर घबराटही पसरली होती. यानंतर एक हल्लेखोरही ठार झाल्याचे सांगण्यात आले.
टय़ुनिशियाच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद अली अरौई यांनी मृतांची संख्या २८ असल्याचे सांगितले. मात्र मृत पर्यटकांचे राष्ट्रीयत्व त्यांनी स्पष्ट केले नाही. सोऊस्से हे पर्यटकांचे अत्यंत आवडते शहर मेडिटेरिनिअन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले असून तेथे प्रामुख्याने ब्रिटिश पर्यटक मोठय़ा संख्येने सुटय़ांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. या हल्ल्यानंतर हॉटेलातील पर्यटकांना आपापल्या खोल्यांमध्येच बसून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोणीही तेथून बाहेर न पडण्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणावर पळापळ झाली, असे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्याने सांगितले.
कुवैतमध्ये २५ ठार
कुवैत सिटी : कुवैतमधील शियापंथीयांच्या एका मशिदीत शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात २५ जण ठार झाले. इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या व स्वत:ला ‘नजद प्रांत’ म्हणवून घेणाऱ्या सौदी अरेबियातील गटाच्या दाव्यानुसार, अबू सुलेमान अल-मुवाहिद याने मशिदीवरील हल्ला घडवून आणला. या ठिकाणी सुन्नी मुस्लिमांना शियापंथाची शिकवण दिली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. सुन्नी मुस्लिमांचा जहाल गट असलेली इसिस ही संघटना शियापंथीयांना पाखंडी मानते.
फ्रान्समध्ये एकाचा शिरच्छेद
सेंट क्वेन्टिन-फालव्हियर (फ्रान्स) : संशयित इस्लामी दहशतवाद्याने पूर्व फ्रान्समधील लिऑन शहरानजीकच्या एका गॅस कारखान्यात शुक्रवारी दिवसाढवळ्या हल्ला चढवून एका व्यक्तीचा शिरच्छेद केला आणि त्याचे शिर दारावर टोचले. स्फोटकांच्या साहाय्याने केलेल्या या हल्ल्यात किमान दोन जण जखमी झाले.