सर्जिकल स्ट्राइकमध्ये उद्धवस्त झालेले दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन उद्धवस्त केलेले दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाल्याची माहिती आहे.

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन उद्धवस्त केलेले दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला आणखी दोन दिवसांनी दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. पीओकेमधील २७ लाँच पॅडसमध्ये २५० दहशतवादी थांबले असून ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

लिपा व्हॅलीमध्ये आठ नवीन लाँच पॅडस बांधण्यात आले असून लष्कराने २०१६ सालच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये हे लाँच पॅडस उडवून दिले होते. गुरेझ, जाजरकोटली, सोपोर, बांदीपोरा या भागात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा उद्देश आहे. यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव आणखी वाढेल.

संयुक्त राष्ट्र सभेच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान बरोबर चर्चा करण्यात तयार झाला होता. भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत व्हावेत हाच भारताचा उद्देश होता. पण सीमेवर पाकिस्तानी लष्कराने भारतीय जवानाची केलेली हत्या आणि काश्मीरमध्ये तीन पोलिसांचे अपहरण करुन झालेली हत्या त्यामुळे भारताने ही चर्चा रद्द केली.

POK मध्ये आणखी एका सर्जिकल स्ट्राइकची गरज
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पुन्हा एकदा सीमा पार करुन दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान सरकार जो पर्यंत लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेवर नियंत्रण आणणार नाही तो पर्यंत सीमेवरील परिस्थितीत सुधारणा होणार नाही असे मत रावत यांनी व्यक्त केले. इंडिया टुडेशी ते बोलत होते. दहशतवादी पोलिसांना लक्ष्य करतायत त्यातून त्यांची हताशा दिसून येते असे रावत म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Terror camp active again which hit in surgical strike