पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले असून, पंजाबमध्ये हल्ले करण्यासाठी कॅनडामध्ये शिख तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या माहितीनंतर केंद्र सरकारने तातडीने कॅनडातील सरकारला सावध राहण्याची सूचना केली आहे. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातील वृत्त दिले. कॅनडात वास्तव्याला असलेला शिख तरूण हरदीप निज्जर हा या गटाचा म्होरक्या आहे.
पंजाबमधील गुप्तचर विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार, सध्या हरदीप निज्जर याला ‘खलिस्तान टेरर फोर्स’चा म्होरक्या बनविण्यात आले आहे. तोच कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतामध्ये शिख तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देतो आहे. पंजाबामध्ये हल्ले करण्यासाठीच हे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. निज्जर याचे तातडीने प्रत्यार्पण करण्यात यावे, यासाठी पंजाब सरकारने एक अहवाल परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडेही पाठवला आहे.