‘दहशतवादाविरोधातील लढाईत पाकिस्तान हा आमचा सहकारी असला तरी पाकिस्तानात दहशतवाद्यांसाठी निर्माण करण्यात आलेली आश्रयस्थाने हा कायमच निषेधाचा विषय आहे. ही आश्रयस्थाने आम्ही कदापि सहन करणार नाही. मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांना पाकिस्तानने त्वरित कठोर शासन करावेच,’ अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतातील आगमनाला अवघे ४८ तास उरले असतानाच ओबामा यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत समज दिली आहे. ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकाला ई-मेलद्वारा दिलेल्या मुलाखतीत ओबामा यांनी पाकविषयी त्यांची मते स्पष्ट केली आहेत. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या झकीऊर रहमान लख्वीला अलीकडेच मिळालेल्या जामिनावर भारताने आक्षेप घेतला होता. तसेच दहशतवादाविरोधातील लढाईबाबत पाकिस्तान गंभीर नसल्याची टीकाही भारताने केली होती. ओबामांच्या पाक टीकेला या विषयाची पाश्र्वभूमी आहे. मुलाखतीत ओबामा पुढे म्हणतात की, भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र आहेत. उभय देशांच्या जनतेच्या सुरक्षा आणि संपन्नतेसाठी दोन्ही देशांची सरकारे कटिबद्ध आहेत.

न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीयही होते, तर २६/११च्या हल्ल्यात काही अमेरिकी नागरिकही ठार झाले. दहशतवादाची झळ भारत-अमेरिका दोन्ही देशांना बसली आहे.
बराक ओबामा, अमेरिकी अध्यक्ष

इसिसच्या ट्विटर अकाऊंटचा माग
ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान त्यांच्या कारमध्येच बॉम्बची पेरणी करू, अशी धमकी देणाऱ्या ट्विटरचा उगम कोठून झाला, याचा शोध आता भारतीय तपाससंस्था घेत आहेत. इसिसकडून धमकीचे हे ट्विट करण्यात आले होते. त्यासाठी ट्विटरकर्त्यांकडेच तपाससंस्थांनी विचारणा केली आहे.

दहशतवाद्यांच्या रडारवर काश्मीर?
ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असला तरी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर दहशतवादी अन्यत्र हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. प्रामुख्याने काश्मिरात दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याचे गुप्तचर संस्थांनी दिलेल्या इशाऱ्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वागत मोदीच करणार
ओबामांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली असून ओबामा यांच्यासाठी खास भारतीय खाद्यपदार्थाच्या मेजवानीचा बेत आखण्यात आला आहे. तर ओबामांच्या पत्नी मिशेल यांना बनारसी शालू भेट देण्यात येणार आहे. ओबामा यांच्या दौऱ्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राजकीय शिष्टाचाराचे संकेत गुंडाळून ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबामा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाणार असल्याचे समजते.  

काँग्रेसचा इशारा
ओबामा यांच्या भारत
दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर आण्विक कराराप्रकरणी काँग्रेसने सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. भारताची कायदेशीर चौकट, संसद आणि राष्ट्रीय हितास तिलांजली देऊन हा करार करण्यात येऊ नये, असे काँग्रेसने म्हटले आहे.