Terror organisation Hizb ut-Tahrir March in Dhaka : भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या हिज्ब उत-तहरीर (Hizb ut-Tahrir) या गटाने शुक्रवारी पहिल्यांदाच बांगलागदेशची राजधानी ढाका एक जाहीर रॅलीचे आयोजन केल्याची घटना समोर आली आहे. मशिदीतील शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर बांगलादेशी प्रशासनाच्या आदेशाविरोधात ही रॅली काढण्यात आली. दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या या गटाच्या रॅलीला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर मशिदीच्या जवळच मोठ्या प्रमाणात राडा झाला. विशेष म्हणजे या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

खिलाफतसाठी (March for Khilafath) काढण्यात आलेल्या या मोर्चाला ढाका शहरातील बैतुल मुकर्रम राष्ट्रीय मशि‍दीच्या उत्तरेकडील गेटपासून सुरूवात झाली. दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा थांबवण्यासाठी हस्तक्षेप केल्यानंतर गोंधळ सुरू झाल्याचे वृत्त ढाका ट्रिब्यूनने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही रॅली सुरुवातीला कोणताही अडथळ्याशिवाय सुरू होती, मात्र पलटन येथून बिजोयनगरकडे जात असताना तणाव वाढला, कारण येथे पोलिसांनी रॅली रोखण्यासाठी अडथळे उभारले होते. हिज्ब उत- तहरीरच्या कार्यकर्त्यांनी याचा विरोध केला.

यादरम्यान गर्दीला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि साउंड ग्रेनेड देखील वापरले ज्यामुळे काही काळासाठी आंदोलनकर्ते पांगले. मात्र काही वेळाने ते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी आपली रॅली पुन्हा सुरू केली. तणाव वाढताना पाहून प्रशासनाने पुन्हा अश्रुधुराचा वापर केला, मात्र याला आंदोलकर्त्यांकडून दगड आणि विटा फेकून प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी तणाव वाढतच गेला आणि अखेर हिज्ब उत-तहरिरच्या अनेक सदस्यांना अटक केल्याचे ढाका ट्रिब्यूनने म्हटले आहे.

या संघटनेवर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे, तसेच त्यांच्या सर्व कारवाया आणि आंदोलने बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या हकालपट्टीनंतर बांगलादेशातील अल्पसंख्यांकावर होत असलेल्या हल्ल्याबाबत भारताने अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे, यादरम्यान दहशतवादी संघटनेच्या समर्थकांनी हा मोर्चा काढल्याची घटना घडली आहे.

भारताने गेल्या वर्षी हिज्ब उत-तहरीरला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हा घट वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे, ज्यामध्ये सामान्य तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी कट्टरपंथी बनवणे आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे अशा बाबींचा समावेश आहे, ज्यामुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला गंभीर धोका निर्माण झाला आहे असे भारत सरकारकडून सांगण्यात आले होते.