काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात, बहुधा अवंतीपुरानजीक दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्याची माहिती पाकिस्तानने भारताला दिली असल्याचे श्रीनगरमधील एका उच्चपदस्थ सुरक्षा अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले आहे. दहशतवादी एखाद्या वाहनावर बसवलेल्या स्फोटक उपकरणाचा (आयईडी) वापर करून हल्ला करू शकतात, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती पाकिस्तानने इस्लामाबादेतील आमच्या दूतावासाला पुरवली आहे. हीच माहिती त्यांनी अमेरिकेलाही दिली असून, त्यांनीदेखील आम्हाला त्याबाबत कळवले आहे. म्हणजेच ही माहिती आमच्याकडे थेट आणि अमेरिकेमार्फतही आली आहे. बहुधा झाकिर मुसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या हल्ल्याची योजना आखण्यात आल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मे २०१७ मध्ये हिज्बुल मुजाहिदीनमधून फुटून निघालेल्या मुसा याने काश्मीरमध्ये अल-कायदाशी संलग्न असलेल्या अन्सार गझावत-उल-हिंद संघटनेची स्थापना केली होती व नेतृत्वही केले होते. गेल्या महिन्यात त्राल भागात सुरक्षा दलांच्या कारवाईत तो मारला गेला. यानंतर अन्सारच्या सदस्यांची संख्या १२ वरून २ ते ३ वर आली असल्याचा पोलीस सूत्रांचा अंदाज आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएपचे ४० जवान ठार झाल्यानंतर भारताने २६ फेब्रुवारीला बालाकोट येथे हवाई हल्ला केला आणि दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने त्याचे प्रत्युत्तर दिले. यामुळे शिगेला गेलेला तणाव पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याने कमी झाला होता. मात्र तरीही पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव होता.

पाकिस्तानने माहिती पुरवण्याचा अर्थ आम्ही दोन प्रकारे लावतो. एक म्हणजे, एखादा मोठा हल्ला झाला, तर त्याचा दोष त्यांच्यावर येणार नाही हे त्यांना निश्चित करायचे आहे,  किंवा आम्हाला माहिती देण्याचा त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणाला.

फुटीरतावादी नेत्यांनी परदेशी निधी हडपला 

जम्मू-काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी नेत्यांना विदेशातून पैसा मिळाला आणि तो त्यांनी मालमत्ता खरेदी करणे आणि परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलांचे शिक्षण अशा वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे राज्यातील दहशतवाद्यांना होणाऱ्या निधी पुरवठय़ाबाबत आपल्या तपासात आढळले, असा आरोप राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) केला आहे.