scorecardresearch

पोलिसांच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला; जम्मू-काश्मीरमध्ये दोन पोलीस शहीद, १२ जखमी 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दोन पोलीस शहीद, १२ जखमी 

श्रीनगरजवळील उच्च सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागात दहशतवाद्यांनी सोमवारी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या बेछूट गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले, तर १२ गंभीररीत्या जखमी झाले.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस सशस्त्र दलाच्या पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसला दहशतवाद्यांनी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात दोन पोलीस शहीद झाले. त्यापैकी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक शिपाई असल्याची माहिती पोलिसांनी ट्वीट संदेशाद्वारे दिली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अनेक पोलीस अत्यवस्थ आहेत.

दहशतवाद्यांच्या गोळीबारात १४ पोलीस जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करून परिसराची नाकाबंदी करण्यात आल्याचे ट्वीट सर्वप्रथम जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले होते. परंतु नंतर जखमी पोलिसांपैकी दोघे शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला दोन दहशतवाद्यांनी केला. ज्या पद्धतीने हा हल्ला करण्यात आला त्यावरून ते ‘आत्मघाती’ दहशतवादी गटाचे असल्याचे निदर्शनास येते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दोनच दिवसांपूर्वी बांदिपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस शहीद झाले होते. तो हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.   

श्रीनगरचे उपनगर असलेल्या झेवान भागात पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. याच पोलिसांच्या सशस्त्र दलाचा तळ आहे. त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) छावण्याही याच भागात आहेत. तरीही दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हे आत्मघाती दहशतवादी असावेत असा अंदाज आहे. 

पोलिसांवर वाढते हल्ले

जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी वारंवार पोलिसांना लक्ष्य करीत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात दहशतवादी हल्ल्यांत १९ पोलीस शहीद झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terrorist attack on a police vehicle 12 injured akp

ताज्या बातम्या