India Airstrike Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्करानं वचपा काढला असून पाकव्याप्त जम्मू-काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारत सरकारनं या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं आहे. या हल्ल्यात एकूण ९ तळांना भारतीय हवाई दलानं लक्ष्य केलं आहे. या तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षित करणं, दारूगोळा साठवणं आणि जंगलातील बचावाचं प्रशिक्षण दिलं जात होतं, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. मात्र, ही माहिती देताना भारतीय लष्करानं पत्रकार परिषदेत थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे.

भारतीय लष्कराची पत्रकार परिषद

भारतीय लष्करानं सकाळी १०.३० च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन त्यात ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. या मोहिमेमध्ये पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील नेमक्या कोणत्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, त्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी प्रत्येक मुद्द्यावर लष्कराची सविस्तर भूमिका मांडली. तसेच, या तळांमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाईंड, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे म्होरके यांना जिथे प्रशिक्षण दिलं, अशा दहशतवादी तळांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाकिस्तानला दिला थेट इशारा

दरम्यान, एअर स्ट्राईक करताना भारतानं खूप संयम बाळगला असून पाकिस्ताननं कुरापती थांबवल्या नाहीत, तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्कराकडून विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. “भारतानं ऑपरेशन सिंदूरमार्फत दहशतवादी तळांना लक्ष्य करताना खूप संयम बाळगला आहे. पण पाकिस्ताननं जर काही आगळीक केली, तर भारतीय लष्कर त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. यातून परिस्थिती अधिक चिघळू शकते”, अशा शब्दांत विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे.

कोणत्या ठिकाणी झाला एअर स्ट्राईक?

भारतीय लष्करानं यावेळी ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक झाला, त्या ठिकाणांची सविस्तर माहिती दिली. त्यात पुढील ठिकाणांचा समावेश होता.

१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद

या ठिकाणांची माहिती देतानाच लष्करानं पत्रकार परिषदेत एअर स्ट्राईक करतानाचे व्हिडीओही दाखवले.