जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या एका तळावर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या मोहिमेत लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले आहे.

लष्कराच्या एका तळावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अतिरेक्यांशी सुरक्षा दलांची चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे पाच जवान जखमी झाले आहेत. राजौरीपासून २५ किलोमीटर दूर दरहाल भागातील परहालमध्ये लष्कराची ही छावणी आहे. या छावणीच्या कुंपणांमधून घुसण्याचा दोन अतिरेकी प्रयत्न करत असल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत अतिरेक्यांचा खात्मा करून लष्कराने आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला.

दरम्यान, या घटनेनंतर सहा किलोमीटरच्या क्षेत्रात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. जखमी जवानांवर लष्कराच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. १६ कोर्प्सचे लेफ्टनंट कमांडर जनरल मनजिंदर सिंग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये एलईटीच्या तीन अतिरेक्यांना बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले होते. त्यातील एक अतिरेकी राहुल भट आणि अमरिन भट यांच्या हत्येत सामिल होता. दरम्यान, स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या इशारा देण्यात आला आहे.