केरळच्या कन्नौर जिल्ह्य़ात २०१३ मध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी अटक केली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नारथ परिसरातील एका घरातून पहाटे अब्दुल जलील (४१) याला अटक केली. सदर घरात अब्दुल जलील याची पत्नी वास्तव्य करीत आहे. जलील याला कोचीतील विशेष एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पॉप्युलर फ्रण्ट ऑफ इंडियात (पीएफआय) सक्रिय असलेल्यांनी नारथ प्रसरात गुप्तपणे दहशतवादी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. दहशतवादी हल्ले करण्यासाठी तेथे तलवार आणि स्फोटकांचे प्रशिक्षण दिले जात होते. थानल प्रतिष्ठान ट्रस्टच्या मालकीच्या इमारतीमध्ये हे प्रशिक्षण दिले जात होते.
जलील हा या प्रतिष्ठानचा कार्यकारी म्होरक्या आहे. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले होते आणि या प्रकरणी त्याच्याविरुद्ध लुक-आऊट जारी करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जलील याच्यासमवेत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी शिहाब नावाच्या इसमाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
फौजदारी स्वरूपाचा कट रचणे, शस्त्रे आणि स्फोटके बाळगणे, जातीय तेढ वाढविण्यास प्रोत्साहन देणे आणि दहशतवादी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.