वृत्तसंस्था, श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनच्या कमांडरसह तीन दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील पहलगामच्या जंगलात झालेल्या चकमकीत मारले गेले. मृत मोहम्मद अशरफ खान ऊर्फ अशरफ मौलवी हा काश्मीर  पोलिसांना प्रदीर्घ काळापासून हवा असलेला दहशतवादी होता. अमरनाथ यात्रा मार्गावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांत अशरफचा समावेश होतो. त्यामुळे सुरक्षा दलांचे हे मोठे यश मानले जात आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांना गेल्या वर्षी जाहीर केलेल्या दहा ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.

 अमरनाथ यात्रामार्गावर केली गेलेली ही कारवाई, हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे, असे ट्वीट काश्मीरचे पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी केले आहे. अशरफ हा दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकेर्नाग येथील रहिवासी होता. त्याने २०१३ मध्ये हिज्बुल मुजाहिदीन संघटनेत प्रवेश केला. गेल्या नऊ वर्षांपासून तो दक्षिण काश्मीरमध्ये ठिकठिकाणी अतिरेकी कारवाया करत होता.  दक्षिण काश्मीरमधील स्थानिक युवकांना अतिरेकी संघटनांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करणाऱ्यांत त्याचा पुढाकार असे.

पहलगाम येथील बातकूटच्या माथ्यावर असलेल्या सिरचंद या जंगली भागात दहशतवादी असल्याचा सुगावा लागताच लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीसांच्या संयुक्त पथकाने या भागाला घेरले. हा भाग दोनपैकी एका अमरनाथ यात्रामार्गावर असून, प्रसिद्ध पर्यटनस्थळही आहे. संयुक्त पथक जवळ येऊ लागताच अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षादलांचा वेढा त्यांना भेदायचा होता. मात्र, संयुक्त पथकानेही प्रतिहल्ला केला. अनेक तास ही चकमक सुरू होती.  अन्य दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटायची आहे.

बारामुल्ला येथे २२ एप्रिलला ‘लष्करे तोयबा’चा वरिष्ठ कमांडर मोहम्मद युसूफ दर ऊर्फ युसूफ कंत्रूला ठार केल्यानंतर अशरफ खान या दुसऱ्या महत्त्वाच्या कुख्यात अतिरेक्यास ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातही ‘लष्करे तोयबा’च्या दहशतवाद्यासह त्याच्या साथीदारास सुरक्षा दलांनी अटक केली. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.