वॉशिंग्टन : टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी ‘ट्विटर’ने घेतला. अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला (सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशन) तशी कागदपत्रे ‘ट्विटर’द्वारे सुपूर्द करण्यात आली आहेत. मस्क हे २०२४ पर्यंत ‘ट्विटर’चे वर्ग -२ संचालक असतील. कंपनीचा मालकीहक्क बदलू नये यासाठी केलेली ही उपाययोजना दिसते. नव्या नियुक्तीनुसार मस्क ट्विटरचे १४.९ भागांपेक्षा जास्त भाग भांडवल घेऊ शकणार नाहीत.

‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये मस्क यांच्या संचालक मंडळावरील संभाव्य नियुक्तीस दुजोरा दिला. त्यांनी नमूद केले, की मस्क यांची प्रभावी सेवा पुरवण्यावर अतीव श्रद्धा असून, त्याबाबत ते कडवे टीकाकारही आहेत. ‘ट्विटर’च्या संचालक मंडळाला ते उंची प्राप्त करून देतील. 

‘ट्विटर’ने आयोगाकडे सुपूर्द केलेल्या कागदपत्रांत नमूद केले आहे, की मस्क यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करणार असून, ते वर्ग -२ संचालक म्हणून कंपनीच्या भागधारकांच्या २०२४ मध्ये होणाऱ्या वार्षिक सभेपर्यंत कार्यरत राहतील. या कार्यकाळात आणि त्यानंतरचे तीन महिने मस्क स्वत: अथवा त्यांच्या समूहाचे सदस्य म्हणून कंपनीच्या १४.९ भागांपेक्षा जास्त भागभांडवलाची मालकी घेऊ शकणार नाहीत.

‘ट्विटर’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से यांनी मस्क यांच्या ट्विटरच्या संचालक मंडळावरील नियुक्तीचे स्वागत करून, मस्क यांना जग व त्यातील ट्विटरच्या भूमिकेविषयी विशेष काळजी आहे व तशी ते समर्थपणे घेतील, असे सांगितले. डोर्से यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये पदभार सोडला असला तरी ते मेपर्यंत ‘ट्विटर’च्या संचालकपदी असतील.

दोन दिवसांत काय घडले?

सोमवारी, मस्क यांनी घोषित केले होते, की ‘ट्विटर’वर मुक्त अभिव्यक्तीबद्दल आक्षेप असूनही, मी ट्विटरमध्ये ९.२ टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. या अधिग्रहणामुळे ते कंपनीतील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक बनले. त्यानंतर लगेचच, मस्क यांनी ट्विटर वापरकर्त्यांना ‘संपादन’ हा पर्याय निर्माण करण्याबद्दल मत देण्याचे आवाहन केले. त्यावर अग्रवाल यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले होते, की याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. तसेच त्यांनी ट्विटर वापरकर्त्यांना काळजीपूर्वक मतदान करण्याचे इशारावजा आवाहन केले होते.

ट्विटरमध्ये येत्या काही महिन्यांत महत्त्वाच्या सुधारणा करण्यावर माझा भर राहील. – इलोन मस्क