लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला असून हे क्षेपणास्त्र नव्याने तयार करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसानंतर उत्तर कोरियाने ही चाचणी केली असून त्यामुळे लष्करी क्षमता वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, उत्तर कोरियाचे हे पहिले अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असू शकेल.

या प्रक्षेपणाची दृश्यचित्रे दाखवण्यात आली. त्यात चलत क्षेपणास्त्रवाहकाचा समावेश होता.  कोरियाच्या मध्यवर्ती वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की गेली दोन वर्षे हे क्षेपणास्त्र तयार करण्याचे काम चालू होते. त्याची क्षमता १५०० कि.मी वरील लक्ष्य भेदण्याची असून शनिवारी व रविवारी त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

उत्तर कोरियाने म्हटले आहे, की देशाचे नेते किम जोंग उन यांनी लष्करी क्षमता वाढवण्याचे आदेश दिले असून  या चाचणीने त्या प्रयत्नात भर पडली आहे. अमेरिका सध्या उत्तर कोरियाशी अणु वाटाघाटी करीत असताना उत्तर कोरियाने ही चाचणी केली आहे.

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अमेरिका व दक्षिण कोरियाचे  गुप्तचर या घटनेचा तपास करीत आहेत. हिंद प्रशांत कमांडने म्हटले आहे, की उत्तर कोरियाच्या कारवायांवर आमचे बारकाईने लक्ष असून तो देश लष्करी कार्यक्रम विकसित करीत असून त्याचा अमेरिका व मित्र देशांना धोका आहे. किम यांनी सत्ताधारी पक्षाच्या अधिवेशनात जानेवारी महिन्यामध्ये अण्वस्त्र क्षमता वाढवण्याचे आदेश दिले होते, तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही सूतोवाच केले होते.