Islamisation of Dallas: मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे स्थलांतर होत असल्यामुळे अमेरिकेतील टेक्सासमधील काही भागांचे इस्लामीकरण सुरू असल्याचा आरोप अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे खासदार ब्रँडन गिल यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, डॅलसमधील एखाद्या मॉलमध्ये गेल्यास तुम्हाला पाकिस्तानमध्ये आल्यासारखे वाटेल. त्यांनी शुक्रवारी रिअल अमेरिकाज व्हॉइसला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले, डॅलस परिसराचे होत असलेले इस्लामीकरण गंभीर आणि चिंतेचा विषय असल्याचे मतदारांकडून ऐकायला मिळत आहे.
“मोठ्या प्रमाणात इस्लाम धर्मीयांचे स्थलांतर होत असून ते आपल्या प्रिय अमेरिकेला मारक ठरत आहे”, या कॅप्शनसह गिल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी आरोप केला की, डॅलसमधील लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे स्थानिक परिसराचे सांस्कृतिक स्वरुप लक्षणीयरित्या बदलले आहे.
खासदार गिल पुढे म्हणाले, डॅलस परिसराचे इस्लामीकरण हा गंभीर चिंतेचा बनलेला आहे. पिढ्यानपिढ्या इथल्या लोकांच्या मालकीच्या जमिनींवर आता मशिदी उभ्या राहत आहेत. आपल्या आवडणाऱ्या ठिकाणाचे मूलभूत स्वरुप बदलत आहे. हे पाहून माझे मतदार चिंतित आहेत. याचीही मला काळजी वाटते.
डॅलसमध्ये नाही तर पाकिस्तानमध्ये असल्यासारखे वाटते
जेव्हा तुम्ही तुमच्या मतदारांना बोलताना ऐकता की, डॅलसमधील एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाकिस्तानमध्ये आल्यासारखे वाटते. हे डॅलस, टेक्सास नाही अशी भावना तुमच्या मनात येते. ही खरी अडचण आहे.
टेक्सासमधील मुस्लीम समुदायाच्या सदस्यांसह अनेकांनी खासदाराच्या विधानावर टीका केली आहे. खासदार गिल जुन्या रुढींना प्रोत्साहन देत असून मुस्लीम अमेरिकन लोकांवर अन्याय करत आहेत आणि त्यांना वेगळे असल्याची जाणीव करून देत आहे. टेक्सास टेक युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्सेस सेंटरमधील पाकिस्तानी वंशाचे डॉक्टर हशम सरवर यांनी गिल यांचा एक जुना फोटो शेअर केला. ज्यात ते त्यांच्या राजकीय मोहीमेसाठी निधी गोळा करताना ११ मुस्लीम नागरिकांसमवेत दिसत आहेत.
भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन पत्रकार मेहदी हसन यांनी खासदार ब्रँडन गिल यांना इस्लामोफोबिक फॅसिस्ट म्हटले आहे. मेहदी हसन यांनी हशम सरवर यांच्या फोटोवर कमेंट करताना म्हटले, “या फोटोतील सर्वात वाईट कोण आहे, हेच समजत नाही. दुटप्पी ब्रँडन गिल की त्यांना मदत करणारे पाकिस्तानी अमेरिकन व्यक्ती.”

