Bihar Election 2025 Results : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून थोड्या वेळात बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर दिसत आहे. बिहार निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कौल हाती येताच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे.

‘बिहारचा विजय आपलाच, आता पुढे पश्चिम बंगालची वेळ’, असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मतमोजणीच्या सुरुवातीचे काही कौल आल्यानंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा निर्णायक विजय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या संदर्भात बोलताना मंत्री गिरीराज सिंह यांनी मोठा दावा केला आहे.

मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं की, “बिहार समजून घेणाऱ्यांना माहिती आहे की बिहारच्या लोकांना जंगल राज (अराजकता) नको आहे. बिहारच्या लोकांना अराजकता नको आहे, किंवा ते भ्रष्ट नेत्यांना सत्ता देऊ इच्छित नाहीत. मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून हे म्हणतो की बिहारचा विजय आपलाच आहे. आता बंगालची पाळी आहे. आपण बंगालमध्येही विजय मिळवू असा विश्वास आहे, कारण तेथील सरकार अराजकतेचं आहे. ते सरकार रोहिंग्या-प्रभावित सरकार आहे. पण बंगालच्या लोकांनाही सत्य दिसेल”, असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.

गिरीराज सिंह यांच्या मते बिहार निवडणुकीचे निकाल ‘जंगल राज’कडे परत न जाण्याचा जनतेचा निर्णय आहे. एनडीएने पुढे आणलेल्या विकासाच्या अजेंड्याला जनतेनी पाठिंबा दर्शविला आहे. मी पुन्हा सांगतो हा विकास आहे. प्रत्येक जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उघडत आहेत. आजच्या तरुणांनी ‘जंगल राज’ पाहिलं नसेल हे खरं आहे. परंतु त्यांच्या पालकांनी पाहिलं असेल. मी स्पष्टपणे सांगतो की, बिहार या भ्रष्ट नेत्यांच्या हाती जाणार नाही”, असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.