नवी दिल्ली : शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मूळ शिवसेना कोणाची व धनुष्यबाण या चिन्हावर कोणाचा हक्क या दोन्ही मुद्दय़ांवर सुनावणी घेऊ नये, अशी विनंती सोमवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली. तसेच, कागदपत्रे सादर करण्यासाठी ४ आठवडय़ांचा वेळही आयोगाकडे मागण्यात आला.

शिंदे गट व उद्धव गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी होत आहे. पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामध्ये हे प्रकरण घटनापीठाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.  मात्र, या प्रकरणावर पुढील सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने  एकनाथ शिंदे गटाने केलेल्या पक्षाच्या मान्यतेसंदर्भात तसेच, धनुष्य बाण या निवडणूक चिन्हांच्या हक्काबाबत ठोस निर्णय घेऊ नये. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवडय़ात झालेल्या सुनावणीमध्ये केद्रीय निवडणूक आयोगाला केली होती.

आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा

शिंदे गटातील अर्जावर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार होती. मात्र, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण आयोगाला करून देण्यात आली व कागदपत्रे सादर करण्यासाठी ४ आठवडय़ांची मुदतवाढही मागून घेण्यात आली. शिवसेनेतील ४० आमदार व १२ खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिंदे गट हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला असून धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा करणारा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला आहे. मात्र, शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा असून निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.