Thailand Gets One Day PM: थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांना मंगळवारी त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले होते. एका गंभीर प्रकरणाच्या चौकशीमुळे देशाच्या संवैधानिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. यानंतर आता थायलंडचे मंत्री सूर्या जुंगरुंगग्रेआंगकिट यांची अवघ्या एका दिवसासाठी थायलंडचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ बुधवारी संपूर्ण दिवस चालणार आहे.
सूर्या जुंगरुंगग्रेआंगकिट यांनी पैतोंगटार्न शिनावात्रा यांची जागा घेतली आहे. नेशन थायलंडच्या वृत्तानुसार, थायलंडच्या इतिहासात पहिल्यांदाच नवीन मंत्रिमंडळ शपथ घेत असताना पंतप्रधानांना निलंबित करण्यात आले आहे.
कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी झालेल्या लीक झालेल्या फोन कॉलची चौकशी होईपर्यंत थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांना संवैधानिक न्यायालयाने मंगळवारी निलंबित केले होते. कंबोडियासोबतच्या अलिकडच्या सीमा वादाच्या हाताळणीवरून शिनावात्रा यांच्याविरोधात नाराजी वाढत आहे.
लीक झालेल्या या फोन संभाषणात शिनावात्रा आणि हुन सेन हे थायलंड-कंबोडिया सीमा तणाव कसा सोडवायचा आणि संघर्षानंतर लादलेले निर्बंध कसे कमी करायचे, यावर चर्चा करताना ऐकू येत आहेत. विविध वृत्तांनुसार, शिनावात्रा यांनी फोन कॉलमध्ये हुन सेन यांचा ‘अंकल’ म्हणून उल्लेख केला आहे.
हुन सेन हे शिनावात्रा यांचे वडील थाक्सिन यांचे जवळचे मित्र आहेत. एपीच्या वृत्तानुसार, शिनावात्रा यांनी फोन संभाषणादरम्यान हुन सेन यांना, “तुम्हाला काय हवे आहे?” असे विचारले. याचबरोबर त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यामुळे शिनावात्रा यांना बरीच टीका सहन करावी लागत आहे. दरम्यान, या प्रकरणी शिनावात्रा यांना माफी मागावी लागली आहे.
कंबोडियासोबतच्या सीमा वादावरून थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांना आधीच बरीच टीका सहन करावी लागत आहे. २८ मे रोजी वादग्रस्त भागात गोळीबार झाला तेव्हा हा वाद आणखी वाढला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले आणि स्वसंरक्षणाचा दावा केला. या घटनेने दीर्घकालीन प्रादेशिक तणाव पुन्हा निर्माण केला.
यानंतर थायलंडने सीमेवर कडक निर्बंध लादले. यामध्ये फक्त आवश्यक वस्तूंच्या निर्यातीलाच परवानगी दिली. त्या बदल्यात, कंबोडियाने थाई माध्यमांवर बंदी घातली, फळे व भाज्यांची आयात थांबवली आणि थाई वीज व इंटरनेट कनेक्शनवर बहिष्कार टाकला. त्यांनी थायलंडमधून इंधन आयात देखील स्थगित केली. थायलंड आणि कंबोडियाची सीमा ८०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे, परंतु काही भागांमध्ये अजूनही वाद आहे.