Lord Vishnu Idol Damage in Thailand-Cambodia Conflict: थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर असलेली भगवान विष्णूची मूर्ती यंत्राच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आली. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अधिकृत भूमिका मांडताना या घटनेवर आक्षेप घेतला होता. तसेच थायलंड सरकारला जाब विचारला होता. यानंतर आता थायलंड सरकारनेही या कारवाई मागचे कारण सांगत भारताला उत्तर दिले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला कंबोडिया आणि थायलंडच्या वादग्रस्त सीमावर्ती भागात थाई लष्कराने २०१४ साली बांधलेली विष्णू मूर्ती यंत्राच्या साहाय्याने खाली पाडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेनंतर जगभरातील हिंदू भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबद्दल बुधवारी (२४ डिसेंबर) प्रतिक्रिया दिली. “हे अनादर करणारे कृत्य जगभरातील भाविकांच्या भावना दुखावणारे आहे”, असे मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले. थायलंड-कंबोडिया सीमेवर स्थापित असलेली मंदिरे या प्रदेशातील लोकांसाठी अत्यंत पूजनीय आहेत आणि या आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले होते.

भारत सरकारच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना थाई-कंबोडियन सीमावर्ती माध्यम विभागाने म्हटले आहे, “सदर कारवाई धर्म किंवा श्रद्धा यांच्याशी संबंधित नाही. थाई सैन्याने या प्रदेशावर पुन्हा नियंत्रण मिळवल्यानंतर केवळ या क्षेत्राचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या कारणासाठी सदर पाडकाम करण्यात आले.” द वीकने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

थाई यंत्रणांनी पुढे म्हटले की, या मूर्तीला धार्मिक स्थळ म्हणून मान्यता मिळालेली नव्हती, तसेच त्याची उभारणी अलीकडच्या काळात झाली होती. तसेच सीमेवर तणाव वाढीस कारणीभूत ठरू शकणारी संवेदनशील चिन्हे हटविण्याच्या हेतूने हे पाडकाम करण्यात आले आहे.

Thailand-cambodia conflict latest news of Vishnu Statue
एक्सवर नोरासिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ साली ॲन सेस पर्वताच्या टेकडीवर भगवान विष्णूची मूर्ती उभारली गेली होती. थायलंड, कंबोडिया आणि भारतीय संस्कृतीचा जुना ऋणानुबंध आहे.

थाई अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सदर मूर्ती सीमावर्ती भागातील वादग्रस्त ठरलेल्या चोंग अन मा परिसरात होती. थायलंडने दावा केलेल्या जमिनीवर कंबोडियाने मुद्दामहून ही मूर्ती उभारली होती, असे थाई यंत्रणांचा समज आहे. थायलंडच्या वतीने असेही सागंण्यात येत आहे की, ते हिंदू धर्मासह सर्वच धर्मांचा आदर करतात. कारण आमचे सर्वांशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत.

कंबोडियाची भूमिका काय?

कंबोडियाने मात्र थायलंडवर आरोप करताना त्यांच्या हद्दतीली भगवान विष्णूची मूर्ती जमीनदोस्त केल्याचा आरोप केला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, कंबोडियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर पाडकाम सीमेहून १०० मीटरच्या अंतरावर झाले. एएफपीच्या वृत्तानुसार, थाई आणि कंबोडियन सैन्यांमध्ये पुन्हा एकदा दीर्घकाळापासून वादग्रस्त असलेल्या सीमेवरून संघर्ष पेटला आहे. या संघर्षात आजवर अनेकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत.