वृत्तसंस्था, बँगकॉक
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी पदावरून हटवले. एक आठवड्यापूर्वी थायलंडमधील मुख्य विरोधी पक्ष विसर्जित करण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाच्या पंतप्रधानांवरील कारवाईच्या आदेशाने थाई राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयीन अधिकाऱ्याला लाच देण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या नियुक्तीवरून हा निर्णय घेतला.
न्यायालयाने श्रेथा यांच्याविरोधात ५-४ मत दिले. या निर्णयाने त्यांना ताबडतोब पदावरून हटवण्यात आले. थाई संसदेने नवीन पंतप्रधान नियुक्त करेपर्यंत काळजीवाहू तत्त्वावर मंत्रिमंडळ कायम राहणार आहे. निकालाच्या काही वेळानंतर गव्हर्नमेंट हाऊसमध्ये बोलताना श्रेथा यांनी स्वत:चा बचाव करण्याची संधी दिल्याबद्दल न्यायाधीशांचे आभार मानले. ‘न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे आणि एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळात नेहमीच नैतिकतेने वागण्याचा प्रयत्न केला, असे श्रेथा यांनी सांगितले. दरम्यान, ‘श्रेथा फेउ थाई’ पक्षाचे फुमथम वेचायचाई हे पंतप्रधानपद भूषवण्याची शक्यता आहे. फुमथम हे प्रथम उपपंतप्रधान आणि श्रेथा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये वाणिज्य मंत्री होते.