Thailand visa rules for Indian tourists : थायलंड सरकारने भारतीयांसह ६० देश आणि प्रदेशांतील नागरिकांसाठी असलेली व्हिसामुक्त मुक्कामाची मर्यादा कमी केली आहे. आता भारतीय पासपोर्टधारकांना थायलंडमध्ये व्हिसाशिवाय ३० दिवसांपर्यंतच राहता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ६० दिवस होती. थायलंडच्या गृह मंत्रालयाने या संदर्भातील नवीन अधिसूचना ३१ ऑगस्ट रोजी रॉयल गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली. त्याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

भारतीयांना व्हिसाची गरज नाही, पण मुक्कामाची मर्यादा कमी

नव्या नियमामुळे भारतीय पर्यटकांसाठी थायलंडचा व्हिसामुक्त प्रवेश मात्र कायम राहणार आहे. म्हणजेच केवळ पर्यटनाच्या उद्देशाने थायलंडला जाणाऱ्या भारतीय नागरिकांना प्रवासापूर्वी व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र, देशात प्रवेश केल्यानंतर परवानगी असलेला मुक्काम आता जास्तीत जास्त ३० दिवसांचा असेल. यापूर्वी भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय ६० दिवसांपर्यंत थायलंडमध्ये राहण्याची परवानगी होती.

२०२४ मध्ये ६० दिवसांची सुविधा सुरू

थायलंडने जुलै २०२४ मध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवली होती. त्यावेळी ९३ देश आणि प्रदेशांतील नागरिकांना ६० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय थायलंडमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. भारताचाही या यादीत समावेश करण्यात आला होता. पर्यटनासोबत काही व्यावसायिक कामकाज आणि काही तातडीच्या कामांसाठीही या व्यवस्थेचा वापर करता येत होता. परिस्थितीनुसार आणखी ३० दिवसांची मुदतवाढ देण्याचा अधिकार स्थलांतर अधिकाऱ्यांकडे होता.

मुक्कामाची मर्यादा का घटवली?

थायलंडच्या मंत्रिमंडळाने मे महिन्यात व्हिसामुक्त प्रवेश व्यवस्थेत बदल करण्यास मंजुरी दिली होती. राष्ट्रीय सुरक्षा, पर्यटन आणि आर्थिक हितसंबंध, परस्पर व्हिसा-सव,लती तसेच विविध देशांसाठी उपलब्ध असलेली ई-व्हिसा व्यवस्था या बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दीर्घकाळ व्हिसामुक्त राहण्याच्या सुविधेचा काही परदेशी नागरिकांकडून गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही थायलंडमध्ये समोर आल्या होत्या. त्यानंतर नियम अधिक कडक करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली.

३० दिवसांपेक्षा जास्त राहायचे असल्यास काय?

भारतीय पर्यटकांना थायलंडमध्ये ३० दिवसांपेक्षा जास्त काळ मुक्काम करायचा असल्यास संबंधित प्रकारच्या थायलंड ई-व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. थायलंडच्या नवी दिल्लीतील दूतावासानेही याबाबतची माहिती दिली आहे.