एक्प्रेस वृत्त

चेन्नई : तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) प्रमुख विजय यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन १२१ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सोपवले. यामुळे गेले दोन दिवस पाठिंबा देणार्‍या आमदारांच्या संख्याबळावरून सुरू असलेले नाट्य अखेर संपुष्टात आले. रविवारी सकाळी दहा वाजता विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होईल. विजय यांना १३ मे पूर्वी विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

राज्यपालांची तीन दिवसांत तीन वेळा भेट घेऊनही टीव्हीकेला बहुमताचा आकडा जुळवता आला नव्हता. त्यावरून राज्यपालांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. शनिवारी सायंकाळी व्हीसीके व मुस्लीम लीग या पक्षांनी पाठिंब्याचे पत्र सोपविल्यानंतर २३४ सदस्य असलेल्या तमिळनाडू विधानसभेत सत्तारूढ सदस्यांचे संख्याबळ बहुमतापार गेले. गेले दोन दिवस बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेची धावपळ सुरू होती. व्हीसीकेने शनिवारी सकाळी होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली. त्यामुळे अनिश्चितता वाढत गेली. अखेर दुपारी त्यांच्या पाठिंब्याने विजय यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

शनिवारी दुपारनंतर राज्यपाल केरळला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांच्याकडे त्या राज्याचाही पदभार आहे. त्यामुळे विजय यांची भेट होणार की नाही याबाबत अनिश्चितता असताना सायंकाळी विजय यांनी राज्यपालांना भेटून पाठिंब्याचे पत्र सोपवले. व्हीसीकेप्रमुख थोल थिरुमव्हलमन तसेच आयएमयूएलचे राष्ट्रीय अध्यक्ष के.एम.कादर मोईनुद्दीन यांनी टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आयएमयूएलने सुरुवातीला पाठिंब्यास नकार दिला होता. मात्र माजी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निर्णय बदलला. राज्यपालांच्या भेटी वेळी विजय यांच्या समवेत तमिळनाडू प्रदेश काँग्रेस अध्यक्ष के. सेल्व्हरपेरुथंगाई तसेच माकपचे राज्य सचिव पी.षण्मुगम उपस्थित होते. टीव्हीकेला बहुमताचा आकडा पार करण्यात यश मिळाल्यावर राज्यभर पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.