CM Vijay OSD: द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांचे वर्चस्व असलेल्या तमिळनाडूमध्ये अवघ्या दोन वर्षापूर्वी उदय झालेल्या जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने घवघवीत यश मिळवले. विजय यांनी काँग्रेससह इतर पक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर निर्णयांचा धडाका सुरु केला आहे. अशात विजय यांनी केलेल्या एका निवडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विजय यांनी त्यांचे ज्योतिषी आणि आध्यात्मिक सल्लागार, रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (राजकीय) (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच नियुक्ती
सी. जोसेफ विजय यांनी रविवारी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर दोनच दिवसात रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची ओएसडी (राजकीय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी आदेशात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच ही नियुक्ती ग्राह्य धरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत १०७ जागांवर विजय मिळाला. विजय यांनी काँग्रेस, व्हीसीके यासह मुस्लिम लीग आणि इतर पक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राज्यपालांना दिला.
शपथविधीच्या वेळेत सुचवला बदल
रिकी राधन पंडित वेट्रिवेल तमिळनाडूमध्ये ज्योतिषी आणि आध्यात्मिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्री विजय यांच्या राजकीय प्रवासात पंडित वेट्रिवेल यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले जाते. विजय यांच्या पक्षाला मिळालेले भरघोस यशाचे भाकीत पंडित वेट्रिवल यांनी खूप पूर्वीच केले होते, असे येथील राजकीय विश्लेषक सांगतात. विजय यांचा रविवारी पार पडलेला शपथविधी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी होईल असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, शपथविधीची वेळ सकाळी दहा करण्यात आली, पंडित वेट्रिवेल यांनीच हा वेळेत बदल केला होता अशी माहिती समोर आली आहे.
शुभेच्छा देण्यासाठी गाठले घर
विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी ११८ हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक होते. पण, तीनवेळा राज्यपालांची भेट घेऊन देखील विजय यांना राज्यपालांकडे बहुमत दाखवता आले नाही. अखेर विजय यांनी राजकीय समीकरण जुळवून आणत राज्यपालांना संख्याबळ दाखवले. विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंंतर पंडित वेट्रिवेल यांनी विजय यांच्या घरी दाखल होत, त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
राज्यात प्रसिद्ध
पंडित वेट्रिवेल गेल्या चार दशकांपासून तमिळनाडूमध्ये ज्योतिष आणि राजकीय सल्लागार म्हणून काम करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी वेट्रिवेल यांचा सल्ला घेतला आहे. पंडित वेट्रिवेल दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्याही जवळच्या व्यक्ती होत्या असे सांगितले जाते. वेट्रिवेल यांच्याशी सल्लामसलत करुनच जयललीता अनेक राजकीय निर्णय घेत असत असे राजकीय विश्लेषक सांगतात. ज्योतिष क्षेत्रातही त्यांना मानणारा मोठा वर्ग तमिळनाडूमध्ये आहे.
