तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १०८ जागा जिंकल्या आहेत. मात्र, १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अभिनेता विजयला दुसऱ्या पक्षाबरोबर हातमिळवणी करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या तामिळनाडूत मोठ्या घडामोडी सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे.

थलपती विजयचा पक्ष लवकरच सरकार स्थापन करणार असला तरी ते नेमकं कोणत्या पक्षाचा पाठिंबा घेतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. कारण विजयने याआधीच भाजपाप्रणीत आघाडीशी हातमिळवणी न करण्याचे संकेत दिले होते. ‘भाजपा आमचा वैचारिक विरोधक आहे, तर डीएमके राजकीय प्रतिस्पर्धी आहे’, असं विजयने निवडणुकीच्या आधीच एका सभेत बोलताना म्हटलं होतं. आता विजयच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विजयने नेमकं काय म्हटलं होतं?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी आणि टीव्हीके पक्षाची स्थापना केल्यानंतर अभिनेता विजयने त्याच्या पक्षाचा राजकीय आराखडा आणि भूमिका आधीच स्पष्ट केली होती. विजयने ‘डीएमके’ला ‘टीव्हीके’चा राजकीय शत्रू आणि भाजपाला वैचारिक विरोधक असल्याचं घोषित केलं होतं.

विजयने म्हटलं होतं की, “टीव्हीके पक्षाचं ध्येय केवळ विद्यमान राजकीय पक्षांना पर्याय बनणं नाही. तमिळनाडूमध्ये बदलासाठीची प्रमुख शक्ती बनणं हे टीव्हीके पक्षाचं ध्येय आहे. तुम्ही नेहमी फॅसिझम, फॅसिझमच्या आरोळ्या मारत राहता आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती पसरवत राहता.” विजयने डीएमकेवर भ्रष्टाचाराचा आणि आपल्या प्रशासनाला ‘द्रविड मॉडेल सरकार’ म्हणून सादर करून लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, टीव्हीकेच्या राजकीय युतीबद्दलच्या चर्चांवर बोलताना विजयने म्हटलं होतं की, “कोणीही टीव्हीकेला एका विशिष्ट रंगात रंगवू शकत नाही किंवा आम्हाला दुसऱ्या पक्षाची ‘बी टीम’ म्हणू शकत नाही. कारण जेव्हा आम्ही ‘पिरापोक्कुम एला उयिरकुम’ (जन्माने सर्व समान आहेत) हे आमचं मूलभूत तत्त्व घोषित केलं, तेव्हा आम्ही कोणाच्या विरोधात आहोत हे सर्वांना माहिती आहे”, असं म्हटलं होतं.

“एक गट आहे जो समाजात फूट पाडत आहे. जे फूट पाडतात ते आमचे पहिले शत्रू आहेत. जे द्रविड विचारधारेचे समर्थन करण्याचा दावा करतात, पण तामिळनाडूला एक कौटुंबिक व्यवसाय म्हणून वापरत आहेत, ते आमचे पुढचे प्रतिस्पर्धी आहेत. भाजपा आमचा वैचारिक विरोधक आहे, तर डीएमके आमचा राजकीय प्रतिस्पर्धी आहे”, असं विजयने म्हटलं होतं.

थलपती विजय ‘किंगमेकर’च्या शोधात! काँग्रेसशी हातमिळवणीची चर्चा

थलपती विजयच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने तमिळनाडूमध्ये इतिहास रचला. द्रविडी राजकारणाभोवती सत्ताखुर्चीचा खेळ करणाऱ्या द्रमुक आणि आण्णाद्रमुक यांना पछाडून विजय यांच्या पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन केला. टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. सत्ता स्थापनेसाठी विजय यांना दुसऱ्या पक्षांना बरोबर घ्यावं लागणार आहे. शिवाय सरकार स्थापन करण्यासाठी आता टीव्हीकेकडून काँग्रेसबरोबर बोलणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसला बरोबर घेणार?

थलपती विजय विरोधी पक्षांसोबत युती करण्याची योजना आखत आहे. टीव्हीके काँग्रेससह विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी युतीबाबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. या पक्षांना लवकरच चर्चेसाठी निमंत्रण पाठवले जाईल, अशी माहिती वृत्तात देण्यात आली आहे.

द्रमुक आघाडीतील पक्षांना सोबत घेण्यासाठी हालचाली

तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा द्रमुक पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज जवळपास सर्व संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. पण, यावेळी द्रमुकला केवळ ५९ जागांपर्यंत मजल मारता आली. द्रमुक यावेळी काँग्रेस, विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी आघाडी करुन निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण, या आघाडीला बहुमताच्या जवळ देखील पोहोचता आले नाही. दरम्यान, आता विजय द्रमुक या आघाडीतील पक्षांचीच सत्ता स्थापनेसाठी मदत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसने काय दिली प्रतिक्रिया?

टीव्हीके काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांना विचारण्यात आले असता, “तमिळनाडूचे हित, पक्षातील सर्वांची मतं विचारात घेऊन निर्णय घेईल”, असे त्यांनी सांगितले.