Thalapathy Vijay TVK majority Tamil Nadu 2026: तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याच्या मार्गातील विजय यांच्यासमोरील शेवटचा अडथळा दूर झाला आहे. थोल थिरुमावलवन यांच्या नेतृत्वाखालील ‘व्हीसीके’ने शनिवारी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. टीव्हीकेने आता काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), आययुएमएल आणि व्हीसीके यांच्या पाठिंब्यामुळे ११८ चा बहुमताचा आकडा ओलांडला असून, युतीचे संख्याबळ आता १२० वर पोहोचले आहे. यामुळे विजय यांचा सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, बहुमताअभावी रद्द करण्यात आलेला शपथविधी आता लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्हीसीकेचा ‘टीव्हीके’ला बिनशर्त पाठिंबा
विदुथलाई चिरुथाईगल कच्ची (व्हीसीके) ने तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याची घोषणा टीव्हीकेचे नेते आधव अर्जुन यांनी केली आहे. आययुएमएलने देखील टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे, यामुळे आता युतीचे संख्याबळ १२० एवढे झाले आहे. शुक्रवारी व्हीसीकेच्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली, या बैठीत विजय यांना पाठिंबा देण्याबाबत थिरुमावलवन यांच्याकडून घोषणा करण्यात आली. या पाठोपाठ इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययुएमएल) यांच्याकडून देखील टीव्हीकेला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
असे आहे युतीचे संख्याबळ
टीव्हीके – १०७
काँग्रेस – ०५
डावे – ०२
व्हीसीके – ०२
आययुएमएल -०२
एकूण – १२०
मुस्लिम लीगकडून पाठिंबा
व्हीसीकेनंतर इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) पक्षाकडून देखील टीव्हीके बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाकडून शनिवारी संध्याकाळी टीव्हीकेला पाठिंब्याचे पत्र सादर केले. याचे फोटोही समोर आले आहेत.
शनिवारी घडामोडींना वेग
सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी जोसेफ विजय यांनी तीनवेळा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. पण, विजय यांना पाठिंबा देणारे व्हीसीकेचे पत्र राज्यपालांना न मिळाल्याने काल रात्रीपर्यंत अनिश्चितता कायम होती. विजय यांनी पाठिंब्यासाठी वैयक्तिकरित्या संपर्क न साधता व्हॉट्सॲप संदेशांद्वारे पाठिंबा मागितल्यामुळे व्हीसीके प्रमुख थोल थिरुमावलवन नाराज झाले होते, असे सांगितले जाते. आययूएमएलने देखील डीएमकेबरोबर असल्याने कठोर भूमिका घेतली होती. दरम्यान, विजय यांनी शनिवारी सकाळी व्हीसीके प्रमुख आणि आययूएमएल नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला.
