तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाचा मोठा करीश्मा पाहायला मिळाला. टीव्हीके पक्षाने तामिळनाडूत जोरदार मुसंडी मारली. विधानसभा निवडणुकीत ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी थलपती विजय यांना छोट्यामोठ्या पक्षांना बरोबर घ्यावं लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या तामिळनाडूत मोठ्या घडामोडी सुरू असून थलपती विजय हे लवकरच सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, थलपती विजय यांच्या पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या या विजयाचं पंतप्रधान मोदींनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता थलपती विजय यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच तामिळनाडूच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
थलपती विजयने काय म्हटलं?
थलपती विजय यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेला मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देखील टीव्हीकेने मिळवलेल्या यशाबाबत शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छानंतर थलपती विजय यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत मोदींचे आभार मानले आहेत.
थलपती विजय यांनी म्हटलं की, “धन्यवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. लोकांचं कल्याण हेच आमचं एकमेव ध्येय आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही तामिळनाडूच्या विकासावर आणि लोकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करू. या आमच्या प्रयत्नासाठी आम्हाला केंद्र सरकारचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे.”
पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं होतं?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देणाऱ्या तामिळनाडूच्या मतदारांचे मनःपूर्वक आभार, आम्ही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहू. तसेच टीव्हीकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचंही अभिनंदन. केंद्र सरकार तामिळनाडूच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी टीव्हीकेच्या विजयाबाबत शुभेच्छा दिल्या होत्या.
थलपती विजय ‘किंगमेकर’च्या शोधात! काँग्रेसशी हातमिळवणीची चर्चा
थलपती विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने तमिळनाडूमध्ये इतिहास रचला. द्रविडी राजकारणाभोवती सत्ताखुर्चीचा खेळ करणाऱ्या द्रमुक आणि आण्णाद्रमुक यांना पछाडून विजय यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला. टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. सत्ता स्थापनेसाठी विजय यांना दुसऱ्या पक्षांना बरोबर घ्यावं लागणार आहे. शिवाय सरकार स्थापन करण्यासाठी आता टीव्हीकेकडून काँग्रेसबरोबर बोलणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसबरोबर सरकार?
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. थलपती विजय विरोधी पक्षांसोबत युती करण्याची योजना आखत आहे. टीव्हीके काँग्रेससह विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी युतीबाबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. या पक्षांना लवकरच चर्चेसाठी निमंत्रण पाठवले जाईल, अशी माहिती वृत्तात देण्यात आली आहे.
द्रमुक आघाडीतील पक्षांना सोबत घेण्यासाठी हालचाली
तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा द्रमुक पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज जवळपास सर्व संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. पण, यावेळी द्रमुकला केवळ ५९ जागांपर्यंत मजल मारता आली. द्रमुक यावेळी काँग्रेस, विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी आघाडी करुन निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण, या आघाडीला बहुमताच्या जवळ देखील पोहोचता आले नाही. दरम्यान, आता विजय द्रमुक या आघाडीतील पक्षांचीच सत्ता स्थापनेसाठी मदत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसने काय दिली प्रतिक्रिया?
टीव्हीके काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांना विचारण्यात आले असता, “तमिळनाडूचे हित, पक्षातील सर्वांची मतं विचारात घेऊन निर्णय घेईल”, असे त्यांनी सांगितले.
