Thalapathy Vijay TVK party wins big in Tamil Nadu Election results surpassing veterans like Rajinikanth : तामिळनाडू विधासभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजय आणि त्याचा पक्ष टीव्हीके यांनी मोठा विजय मिळवला आहे. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलेल्या विजयच्या पक्षाने १०० हून अधिक जागा जिंकल्या असून तो तामिळनाडूतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

तामिळनाडूमधील डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणू शकेल अशा पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा होत होती. या दोन पक्षांचे वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक मोठ्या-मोठ्या दिग्गजांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा धुळीस मिळाल्या. इतकेच नाही तर राष्ट्रीय पक्षांनाही ते आतापर्यंत शक्य झालेले नाही.

पण अखेर करिष्मा करून दाखवणारा कोणीतरी तामिळनाडूच्या राजकारणात अवतरला. थलपती विजयने आपल्या चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीला पूर्णविराम देऊन राजकारणात उडी घेतली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ‘तमिळगा वेत्री कळघम’ या त्याच्या पक्षाला १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. विजयने तीन मोठी आव्हनं थोपवत रजनीकांत, कमल हासन आणि विजयकांत यांना शक्य झालं नाही ते यशस्वीपणे करून दाखवले आहे.

१) रजनीकांत

गेल्या २५ वर्षांपासून सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे, रजनीकांत यांची लोकप्रियता आणि त्यांचा चाहतावर्ग टीव्हीकेचे प्रमुख विजय यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. मात्र, प्रकृतीचे आणि कोरोना महामारीचा कारण देत रजनीकांत यांनी एकही निवडणूक न लढवता २०२० मध्ये राजकारणातून माघार घेतली.

२) कमल हासन

कमल हासन यांचा राजकीय पक्ष ‘मक्कल नीथी मय्यम’ (MNM) या पक्षाची २०१९ आणि २०२१ मध्ये चांगलीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या पक्षाचा प्रभाव काही शहरी भागांपुरता आणि बुद्धिजीवी मतदारांपुरताच मर्यादित राहिला. २०२६ मध्ये कमल हासन अधिकृतपणे या शर्यतीतून कधीचेच बाहेर पडले आहेत. त्यांनी स्वतः ही निवडणूक लढवण्याऐवजी डीएमके आघाडीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

३) विजयकांत

थलपती विजयच्या आधी राजकीय व्यवस्थेला खऱ्या अर्थाने विजयाकांत यांनीच धक्के दिल्याचे पाहायला मिळते. २००६ मध्ये त्यांच्या डीएमडीके पक्षाने ८ टक्के मते मिळवली होती, तर २०११ मध्ये एआयएडीएमके बरोबर (AIADMK) युती करून ते विरोधी पक्षनेते बनले होते. मात्र, सातत्याने बदलणाऱ्या आघाड्यांमध्ये ते ज्युनिअर पार्टनर बनल्याने डीएमडीकेचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. ‘कॅप्टन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विजयाकांत यांचे २०२३ मध्ये निधन झाले.

थलपती विजयने वेगळं काय केलं?

विजयच्या आधी चित्रपटसृष्टीतून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या नेत्यांपेक्षा विजयने वेगळी स्टॅटर्जी वापरल्याचे दिसून येते. रजनीकांत यांच्याप्रमाणे विजयने राजकारणात प्रवेश करण्यास अनाठाई वेळ लावला नाही. २०२४ मध्ये टीव्हीके स्थापना केल्यानंतर, विजयने तळागाळात संघटन वाढवण्यावर भर देण्यासाठी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर आपली सर्व शक्ती ही २०२६ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी झोकून दिली. २०२६ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा अत्यंत धाडसी आणि जोखमीचा निर्णय विजयने घेतला.

विजयने दुसरी एक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे त्याने कमल हासन यांच्याप्रमाणे फक्त शहरी भागांपुरता मर्यादित प्रभाव असलेला पक्ष अशी प्रतिमा स्वतःभोवती तयार होऊ दिली नाही. लोकांसाठी कल्याणकारी योजनांची आश्वासने आणि ग्रामीण मतदारसंघांसह वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांवर लक्ष केंद्रित करून, विजयने सर्व स्तरांतील मतदारांना आकर्षित केले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विजयकांत यांच्याप्रमाणे आघाडीच्या राजकारणात न गुरफटता विजय याने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आणि टीव्हीकेला डीएमके आणि एआयडीएमके या दोन पक्षांचा प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरवले. आता निवडणुकीचा निकाल पाहाता हे धाडस विजय याच्यासाठी फायद्याचे ठरले आहे.