राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम ९५ (१) अन्वये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत होणार आहे. या काळात सभागृहाच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल. तोपर्यंत, हंगामी अध्यक्षाची काही महत्त्वाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी निवड केली जाते.

हंगामी अध्यक्षचा अर्थ ‘काही काळासाठी’ किंवा ‘तात्पुरता’ असा होतो. १९९८ पासून बीजेडीच्या तिकिटावर सहा वेळा जिंकलेल्या महताब यांनी अलिकडच्या वर्षांत प्रादेशिक पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांचे पुत्र भर्तृहरी महताब २०२४ मध्ये कत्तक लोकसभा मतदारसंघात विजयी झाले. यावेळी त्यांनी बीजेडीच्या संतरुप मिश्रा यांचा पराभव केला.

हेही वाचा >> लोकसभेचा हंगामी अध्यक्ष कोण असतो? त्याची निवड कशी केली जाते?

हंगामी अध्यक्ष म्हणजे काय?

संसदीय लोकशाहीमध्ये अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लोकसभेचा अध्यक्ष हा लोकसभेचे कामकाज चालविणारा नेता असतो. राज्यघटनेच्या कलम ९४ नुसार, “लोकसभा विसर्जित झाल्यानंतर त्याची पहिली बैठक होईपर्यंत अध्यक्ष आपल्या पदावरच राहतात.” नव्या लोकसभेमध्ये सभागृहाच्या अध्यक्षाची निवड साध्या बहुमताने केली जाते. त्याची ही निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षांकडून काही महत्त्वाची कामे पार पाडली जातात. ‘हंगामी’ अथवा ‘Pro-tem’ या शब्दाचा अर्थच ‘थोड्या कालावधीकरीता’ अथवा ‘तात्पुरता’ असा आहे. राज्यघटनेमध्ये या पदाचा उल्लेख केलेला नाही. ‘संसदीय कामकाज मंत्रालया’च्या कार्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेमध्ये हंगामी अध्यक्षाची नियुक्ती आणि शपथविधीबाबतच्या तरतुदी नोंद करण्यात आल्या आहेत.

हंगामी अध्यक्षांची निवड कशी केली जाते?

संसदीय कामकाज मंत्रालयाच्या कार्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेमध्ये असे नोंद करण्यात आले आहे की, नवी लोकसभा स्थापन होण्याआधी जर अध्यक्षांची जागा रिकामी झाली असेल, तर त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी सभागृहातीलच एका सदस्याची राष्ट्रपतींच्या आदेशाने हंगामी अध्यक्षपदी निवड केली जाते. नव्या लोकसभेमधील सदस्यांचा शपथविधी करून घेणे हे प्रामुख्याने हंगामी अध्यक्षांचे काम असते. राज्यघटनेच्या कलम ९९ नुसार, “लोकसभेमधील सदस्यत्वाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक सदस्याने शपथ घेणे गरजेचे असते. ही प्रक्रिया राष्ट्रपतींसमोर अथवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधीसमोर पार पाडली जाते. राज्यघटनेच्या तिसऱ्या अनुसूचीनुसार, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली जाते.” सामान्यत: लोकसभेच्या निवडून आलेल्या इतर तीन सदस्यांनाही राष्ट्रपती शपथविधीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करतात. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या कार्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेमध्ये नमूद केल्यानुसार, सामान्यत: लोकसभेत सर्वाधिक काळ सदस्य राहिलेल्या व्यक्तीची हंगामी अधयक्षपदी निवड केली जाते. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर, लोकसभेतील सर्वांत वरिष्ठ सदस्यांची यादी तयार केली जाते. ही यादी संसदीय कामकाज मंत्री अथवा पंतप्रधानांकडे पाठवली जाते. ते हंगामी अध्यक्ष तसेच शपथविधीची प्रक्रिया पार पाडणाऱ्या इतर तीन सदस्यांची निवड करतात.