अरूणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेला मुलगा चिनी ‘पीएलए’ला सापडला

भारतीय लष्करास ‘पीएलए’ने कळवले ; या मुलाचे अपहरण करण्यात आले असल्याचाही आरोप केला गेला आहे.

(फोटो सौजन्य- (@TapirGao)

भारतीय लष्कराने सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील एक मुलगा जो त्याच्या गावातून “बेपत्ता” झाला होता तो चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ला सापडला आहे.

“चिनी लष्कराने आम्हाला कळवले आहे की त्यांना अरुणाचल प्रदेशमधून हरवलेला मुलगा सापडला आहे आणि त्याला परत पाठवण्यासाठी योग्य प्रक्रिया सुरू आहे,” अशी माहिती तेजपूर पीआरओ लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी दिली आहे.

अरुणाचल प्रदेशातील सियुंगलाच्या अंतर्गत असलेल्या लुंगटा जोर भागातील १७ वर्षीय मिराम तारोन असे या तरुणाचे नाव असून, मंगळवार, १८ जानेवारी रोजी तो बेपत्ता झाला होता.

अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी बुधवारी, पीएलएने राज्यातील भारतीय हद्दीतील अप्पर सियांग जिल्ह्यातून एका १७ वर्षीय किशोरवयीन मुलाचे अपहरण केल्याची माहिती दिली होती. गाओ यांनी सांगितले होते की, ”अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मिराम तारोन असे आहे. चिनी सैन्याने सेउंगला प्रदेशातील लुंगटा जोर भागातून या मुलाचे अपहरण केले. पीएलएमधून पळून जाण्यात यशस्वी झालेला तारोनचा मित्र जॉनी यिंग याने स्थानिक अधिकाऱ्यांना अपहरणाची माहिती दिली होती.”

“बेपत्ता मुलाबद्दल माहिती नाही”; पीएलएवरील आरोपांनंतर चीनचे स्पष्टीकरण

जेव्हा भारतीय लष्कराला तारोनबद्दल कळले, तेव्हा त्यांनी ताबडतोब हॉटलाइनद्वारे पीएलएशी संपर्क साधला आणि वनौषधी गोळा करणाऱ्या एका मुलाचा रस्ता चुकला आहे आणि त्याचा शोध लागलेला नाही, असे सांगितले होते.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशवर चीन सातत्याने आपला दावा सांगत आहे. अरुणाचलबाबत चीनचा हेतू लपलेला नाही. चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांची नावे बदलून महिनाही उलटलेला नाही. चीनने आपल्या नवीन जमीन सीमा कायद्यांतर्गत अरुणाचलच्या १५ ठिकाणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. चीनने हा कायदा २०२२ मध्येच लागू केला. चीनने आठ शहरे, चार पर्वत, दोन नद्या आणि एका खिंडीसह १५ ठिकाणांची नावे बदलली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The boy who went missing from arunachal pradesh was finally found in china msr

Next Story
धर्म संसद: …तर मुस्लीम नेत्यांवरही द्वेषपूर्ण भाषणांसाठी कारवाई व्हावी, हिंदू सेनेची सुप्रीम कोर्टात मागणी
फोटो गॅलरी