राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा दिल्लीत निघाला आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांनी देश लुटला आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

काँग्रेस पक्षाने जे काही चालवलं आहे ते पूर्णपणे संविधान विरोधी आहे. संविधान हातात घ्यायचं आणि संविधानाने निर्माण झालेल्या संस्थांना बदनाम करणं सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय, CAG, आरबीआय अशा संस्था कुचकामी आहेत असं दाखवायचं, लोकांना त्या विरोधात भडकवायचं. आता संविधान बदलावं लागेल हे शेवटी सांगायचं. अति डावी विचारसरणी यांना प्रस्थापित करण्याचं हे षडयंत्र आहे. भारताचं संविधान नाकारण्याचं काम राहुल गांधी आणि इंडी आघाडीने केलं आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढू आणि सरन्यायाधीशांनी आमची भेट घेतली पाहिजे आणि निवेदन घेतलं पाहिजे. मला सांगा हे कुठल्या संविधानात लिहिलं आहे? असा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं आहे-फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम जाणीवपूर्वक चाललं आहे. तुम्ही कुठल्याही विचारसरणीचे असाल तरीही मला तुमचा सवाल आहे की सरन्यायाधीशांनी अशा प्रकारे मोर्चाला सामोरं जाणं हे संविधानाला धरून आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याला अपेक्षित आहे का? भारतीय संविधानानुसार अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करता येतो का? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. सर्वोच्च न्यायालयालयाही कमकुवत करण्याचा प्रयत्न यांचा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान नाकारणं हाच यांचा डाव आहे.

राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये मुलभूत अधिकार गोठवले होते-फडणवीस

१९७५ मध्ये राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी संविधान संशोधन करून डॉ. आंबेडकर यांनी जे मुलभूत अधिकार दिले होते ते गोठवले होते. मुलभूत अधिकारांचं हनन झालं तर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही असंही संशोधन केलं होतं. आम्ही त्यावेळीही संघर्ष केला होता आणि आम्ही पुन्हा संघर्ष करतो आहोत. माझा इशारा आहे तुम्हाला जर संविधानाशी छेडछाड कराल तरीही काहीही झालं तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही. जंतर-मंतर या ठिकाणी जेव्हा अराजकता सुरू होती तेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्गोरिदम सेट झाले होते आणि तसाच कंटेट त्यावेळी येत होता. या सगळ्या प्लॅटफॉर्मन्सी हे मान्य केलं की आम्हाला त्या पोस्टसाठी पैसे मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट काढून टाकण्यात आली होती, त्याबाबत मेटाने माफीही मागितली होती. काँग्रेस पक्ष सातत्याने हरल्याने आणि जिंकण्याची त्यांना काही आशा वाटत नाही म्हणून अशा पद्धतीने अराजक माजवण्याचा काँग्रेसचा आहे. आम्ही हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.