माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्ली उसळेल्या शीख दंगलीच्या चौकशी प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती धिंग्रा आयोगाने आपला अहवाल सादर केला. या अहवालानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अहवालाची माहिती दिली. “न्यायमूर्ती धिंग्रा आयोगानं आपला अहवाल सुपूर्द केला आहे. त्यातून या दंगलीची सत्यता समोर आली आहे. १९८४च्या शीख दंगलीत नरसंहार करणाऱ्या आरोपींना काँग्रेसनं संरक्षण दिल्याचं म्हटलं आहे,” असं जावडेकर यांनी सांगितलं.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. दोन्ही सुरक्षा रक्षक शीख समुदायातील होते. १९८४मध्ये झालेल्या या हत्येनंतर दिल्लीमध्ये शीखाविरोधात दंगल उसळली होती. यात अनेकांची हत्या करण्याबरोबर जाळपोळ करण्यात आली होती. या दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता. या आयोगानं आपला अहवाल सरकारला सुपूर्द केला आहे.

या अहवालाविषयी बोलताना जावडेकर म्हणाले, “आयोगानं स्पष्ट केलं आहे की,१९८४च्या शीख दंगलीत नरसंहार करणाऱ्या आरोपींवर काँग्रेसनं कारवाई होऊ दिली नाही. विशेष म्हणजे संरक्षण देण्याचं काम केलं. आयोगाचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. या दंगलीची आतापर्यंत कधीच योग्य दिशेनं चौकशी झालेली नाही. तीन हजारपेक्षा जास्त शिखांना या दंगलीत जाळून मारण्यात आलं होतं. त्यांची घरं लुटण्यात आली. अत्यंत क्रूर घटना त्यावेळी घडल्या होत्या,” असं जावडेकर यांनी सांगितलं.