Narendra Modi on Congresss : एआय ग्लोबल समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्टलेस निदर्शने केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या या कृतीमुळे राष्ट्रीय कार्यक्रम कमकुवत केल्याचा त्यांनी आरोप केलाय. या निषेधामुळे तांत्रिक प्रगती आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या प्रतिष्ठा मलिन झाली आहे, असं मेरठमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

देशात लाखो विदेशी नागरीक आले होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतात जागतिक एआय संमेलन झाले. जगभरातील ८० हून अधिक देशाचे प्रतिनिधी दिल्लीत आले होते. जगभरातील २० हून अधिक देशांचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले. लाखो लोक भारताच्या काना कोपऱ्यातून दिल्लीत आले होते. जगातील विकसिनशील देशात असं संमेलन कधीच झालं नव्हतं, तसं एआय संमेलन भारतात झालं, तुम्हाला गर्व वाटला की नाही?”

जुन्या पक्षाचं वैचारिक दिवाळं निघालं

“संपूर्ण देश गर्वाने व्यापलेला आहे. पण काँग्रेस आणि त्यांच्या इको सिस्टमने काय केलं? काँग्रेसने भारताच्या एक वैश्विक आयोजनाला आपल्या घाणेरड्या आणि नग्न राजकारणाचा आखाडा बनवला. समारोह स्थळावर विदेशी अतिथींसमोर काँग्रेसचे नेते कपडे काढून पोहोचले. मी काँग्रेसवाल्यांना विचारतो, देशाला माहितये तुम्ही आधीच नग्न आहात, मग कपडे उतरवण्याची गरज काय होती? काँग्रेसच्या नेत्यांनी तिथे जे काही केलं , त्यामुळे असं दिसतंय की देशातील सर्वांत जुना पक्षाचं वैचारिक दिवाळं निघालं आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

काँग्रेसला माझी कबर खोदायची आहे

“गावात एखाद्या घरी लग्न असेल तर तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण गाव प्रयत्न करत असतो. कारण, गावात येणाऱ्या पाहुण्याला गावासाठी चांगलं वाटलं पाहिजे, आम्ही तसे लोक आहोत, असंही मोदी म्हणाले. काँग्रेसने तर आपल्याच देशाला बदनाम करायला प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या नेत्यांची मोदींशी दुष्मनी आहे. त्यांना माझी कबर खोदायची आहे. माझ्या आईलाही ते शिव्या देतात. त्यांचा भाजपा, एनडीएला विरोध आहे. तुम्हाला राजकारणात हेच करणं गरजेचं असेल तर आम्ही हेही सहन करू. पण काँग्रेसने लक्षात ठेवलं पाहिजे की एआय ग्लोबल समिट हा भाजपाचा समारंभ नव्हता. तिथे भाजपाचा नेताही उपस्थित नव्हता. हा देशाचा कार्यक्रम होता. देशाच्या सन्मानाचा कार्यक्रम होता. काँग्रेसने सर्व मर्यादा तोडली. आता पूर्ण देश काँग्रेसच्या नीतीवर थुंकत आहे”, असंही मोदी म्हणाले.

राहुल गांधीमुळे मित्र पक्षांचं नुकसान

“इतक्या जुन्या पक्षाचा नेल्याला लाज वाटण्यापेक्षा तो गर्जत आहे. देशाची बेइज्जती करण्याऱ्यांचा जयकार करत आहेत. संसदेत काहीच सादर करू शकत नाही, आपल्या मित्रपक्षांनाही बोलायला देत नाहीत. संसदेत कामकाज करू देत नाहीत. याचा सर्वांत मोठं नुकसान काँग्रेसच्या मित्रपक्षांना होत आहे. दिल्लीत नग्नपणा दाखवला, त्यामुळे त्यांचे मित्रपक्षही आश्चर्यचकित झाले आहेत”, असंही ते म्हणाले.

“जर तुम्हाला पंतप्रधानांच्या खूर्चीवर बसायचं असेल तर आधी जनतेचं मन जिंकावं लागेल. महिला खासदारांना पाठवून जागेवर कब्जा करून पंतप्रधान करता येत नाही. माता भगिंनीना पुढे करण्याची काय मजबुरी झालीय तुमची?”, असंही ते म्हणाले.

एआय समिटमध्ये काय झालंय?

दरम्यान, जागतिक एआय शिखर परिषदेचे आयोजन करणाऱ्या दिल्लीतील भारत मंडपमच्या हॉल क्रमांक ५ मध्ये भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १० निदर्शकांनी क्यूआर कोडेड प्रवेश पास वापरून कार्यक्रमस्थळी प्रवेश केला आणि नंतर त्यांचे टी-शर्ट काढून पंतप्रधानांविरुद्ध घोषणाबाजी केली. निदर्शकांनी मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमा असलेले पांढरे टी-शर्ट घातले होते किंवा त्यांच्या हातात होते, तसेच “भारत-अमेरिका व्यापार करार”, “एपस्टाईन फाइल्स” आणि “पंतप्रधानांशी तडजोड झाली आहे” अशा घोषणाही दिल्या होत्या.