scorecardresearch

काश्मीर फाईल्सवरुन दोन मुख्यमंत्री आमने-सामने; एक म्हणाले “मनात वेदना”, तर दुसरे म्हणतात “चित्रपटात सर्व अपूर्ण”

भाजपा नेते चित्रपटाची स्तुती करत असताना दुसरीकडे विरोधक मात्र यावरुन आरोप करत आहेत

बॉक्स ऑफिसवर सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट धुमाकूळ घालत आहे. दुसरीकडे या चित्रपटामुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. एकीकडे भाजपा नेते चित्रपटाची स्तुती करत असताना दुसरीकडे विरोधक मात्र यावरुन आरोप करत आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं असून बदनामीचा कट आखला जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या चित्रपटावरुन बुधवारी रात्री दोन मुख्यमंत्री आपापसात भिडले. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर आपलं मत मांडलं आणि त्यानंतर राजकीय वादात भर पडली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी रात्री पत्नी साधना सिंग, कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग आणि मोहन यादव यांच्यासहित चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी हा जबरदस्त चित्रपट असल्याचं सांगत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं कौतुक केलं. चित्रपट पाहिल्यानंतर आपलं मन वेदनांनी भरुन आल्याचं त्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेलदेखील चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. चित्रपटात हिंसा सोडून काही नाही, सर्व काही अर्धवट दाखवण्यात आल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

“काश्मीरचं सत्य लपवण्याचा प्रयत्न”

चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत म्हटलं की, चित्रपटात एक सीन आहे ज्यामध्ये सांगितलं आहे की जोपर्यंत सत्य समोर येतं तोपर्यंत खोटं संपूर्ण जग फिरुन येतं. काश्मीरचं सत्य लपवण्याचा, दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. काश्मिरी बहिण भावांवर जे अत्याचार झाले तसं उदाहरण अजून कुठे मिळत नाही असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी विवेक अग्निहोत्री यांचे आभार मानत सत्य उघड केल्याचं सांगितलं. देशातील ज्या लोकांना माहिती नव्हतं, त्यांना आता कळेल. मोदी पंतप्रधान आहेत आणि कलम ३७० हटवण्यात आलं आहे हे आमचं सौभाग्य आहे. काश्मीरमधील स्थिती आत बदलत आहे असं ते म्हणाले.

भाजपाने काश्मिरी पंडितांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही – बघेल

चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले की, “आताच काश्मीर फाइल्स चित्रपट पाहून परतलो आहे. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, भाजपाच्या सहकार्याने चालणाऱ्या सरकारने काश्मिरी पंडितांना रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता. तर त्यांना जाण्यास सांगितलं होतं. तिथे सैन्य पाठवण्यात आलं नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी लोकसभेला घेरलं तेव्हा सैन्य पाठवण्यात आलं”.

या चित्रपटात कोणताही संदेश नसून सर्व काही अपूर्ण असल्याचं बघेल म्हणाले. फक्त हिंसा दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. भाजपावाल्यांना समोर उभं राहा सांगितलं तर ते पळून जातात असा टोलाही त्यांनी लगावला. बघेल यांना भाजपाच्या आमदारांना सोबत चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. पण कोणीही आलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kashmir files madhya pradesh cm shivraj singh chauhan chhatisgarh cm bhupesh baghel sgy

ताज्या बातम्या