हरयाणातील सोनीपतचे रहिवासी असलेले बीएसएफचे शहीद जवान नरेंद्र सिंह यांचे पाकिस्तानी रेंजर्सने अपहरण करुन त्यांना हलाहल करुन ठार केले. जम्मूमध्ये सीमेनजीक त्यांचा मृतदेह भारतीय जवानांना छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. या जवानाच्या कुटुंबियांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून यासाठी कायद्यात बदल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नरेंद्र सिंह यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर केजरीवाल म्हणाले, शहीद जवान नरेंद्र सिंह यांच्यासोबत पाकिस्तानच्या सैन्याने जे कृत्य केले आहे. त्याचा कोणत्याही परिस्थितीत बदला घ्यायला हवा. कारण जवान कुठल्याही एका प्रदेशाचा नसतो तर तो संपूर्ण देशाचा असतो.

दरम्यान, केजरीवाल यांनी शहीद नरेंद्र सिंह यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील कायदा बदलणार असल्याचे सांगितले. शहीद नरेंद्र यांचे कुटुंबिय दिल्लीमध्ये राहते. त्यामुळे दिल्ली सरकारची त्यांची काळजी घेणे ही जबाबदारी आहे. त्यासाठीच दिल्ली सरकार मंत्रीमंडळाच्या बैठकीत एक विशेष प्रस्ताव आणणार असून त्याद्वारे सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. याद्वारे शहीद नरेंद्र यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची तरतुद करण्यात येईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

दिल्ली सरकार शहीद सिंह यांच्या कुटुंबियांची हरप्रकारे मदत करेन असे सांगताना केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मोदी आधी म्हणायचे की, पाकिस्तानला केवळ पत्र पाठवून भागणार नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. मात्र, आता ते पंतप्रधान असतानाही पाकच्या या नापाक कृत्याविरोधात कारवाई करताना दिसत नाहीत.

जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये शहीद झालेले बीएसएफचे जवान नरेंद्र सिंह यांचे पार्शिव शरीर जेव्हा भारतीय जवानांना मिळाले तेव्हा ते शरीर बघून त्यांच्या अंगावर काटा आला होता. ५१ वर्षीय नरेंद्र सिंह यांचे पाकिस्तानी सैनिकांनी अपहरण करुन त्यांचा गळा चिरला, शरीराला वीजेचे झटके दिले, एक पाय तोडला यानेही पाक सैनिकांचे समाधान न झाल्याने त्यांनी नरेंद्र सिंह यांचे डोळेही काढले. अशा पद्धतीने अतिशय अमानवी पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली होती.