Uganda Ultimatum Turkey : युगांडाचे लष्करप्रमुख जनरल मुहूजी कैनेरुगाबा यांनी तुर्कियेकडे दोन अजब मागण्या केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास तुर्कियेशी सर्व राजनैतिक संबंध तोडण्याची आणि तुर्किये एअरलाइन्सवर बंदी घालण्याची धमकी देखील युगांडाचे लष्करप्रमुख मुहूजी कैनेरुगाबा यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या मुहूजी कैनेरुगाबा हे जगभरात चांगलेच चर्चेत आले आहेत.
दरम्यान, युगांडाचे लष्करप्रमुख जनरल मुहूजी कैनेरुगाबा हे नेमकं कोण आहेत? मुहूजी कैनेरुगाबा यांनी तुर्कियेकडे नेमकं कोणत्या दोन मागण्या केल्या आहेत? आणि युगांडाच्या लष्करप्रमुखांची तुर्कियेला नेमकं काय इशारा दिला आहे आणि त्यामागचं कारण काय? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
युगांडाच्या लष्कर प्रमुखांनी काय मागण्या केल्या?
मुहूजी कैनेरुगाबा हे सध्या युगांडाचे लष्करप्रमुख आहेत. मात्र, कैनेरुगाबा यांनी केलेल्या या अजब मागण्यांवरून त्यांच्यावर आता जगभरातून टीकेची झोड उठली आहे. कैनेरुगाबा यांनी तुर्कियेकडे दोन मागण्या केल्या आहेत. त्यांची पहिली मागणी अशी आहे की, सोमालियातील अतिरेक्यांविरुद्धच्या लढ्यात युगांडाने दिलेल्या दीर्घकालीन लष्करी योगदानाबद्दल तुर्कीने त्यांना नुकसान भरपाई म्हणून १ अब्ज डॉलर्स दिले पाहिजेत.
तसेच मुहूजी कैनेरुगाबा यांनी दुसरी मागणी अशी केली आहे की, तुर्कियेने त्यांच्या देशातील सर्वात सुंदर वधू द्यावी, जिच्याशी ते लग्न करू शकतील, अशी अजब मागणी केली. तसेच लष्करप्रमुख मुहूझी कैनेरुगाबा यांनी तुर्कियेला इशारा दिला की ३० दिवसांच्या आत त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राजनैतिक संबंध तोडण्यात येतील. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मुहूजी कैनेरुगाबा यांनी केलेली दुसरी मागणी ही गंमतीने केली असावी असंही आता बोललं जात आहे. मात्र, यावरून आता कैनेरुगाबा यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याआधीही मुहूजी कैनेरुगाबा यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं होतं. २०२२ मध्ये मुहूजी कैनेरुगाबा यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवत त्या बदल्यात इटलीला १०० गायी देऊ केल्या होत्या.
दरम्यान, युगांडाचे लष्करप्रमुख जनरल मुहूझी कैनेरुगाबा हे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे सुपुत्र आहेत. तसेच कैनेरुगाबा यांनी या त्यांच्या मागणीबाबत एक्सवर पोस्ट देखील शेअर केली होती. दरम्यान, मुहूझी कैनेरुगाबा यांच्या या वक्तव्याबाबत अद्याप युगांडा, तुर्किये किंवा सोमालियाकडून सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
